अमिताभला ‘किसान’कडून ६ कोटी आणि बळीराजा उपाशीपोटी !

amitabh
नवी दिल्ली – दुष्काळ सदृष्य परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली असून दुबार पेरणीचे अनेक भागात संकट उभे राहिले आहे. तर विधानसभा शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे यासाठी दणाणत आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देशभर वाढतच चालली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान चॅनेल सुरू करून शेतकऱ्यांसाठी अच्छे दिनचे स्वप्न पाहिले. आता चॅनेल सुरू करायचे तर ते लोकप्रियही ठरायला पाहिजे. आज सुमारे ८०० चॅनेल्स भारतात दिसतात. त्यातील ४०० चॅनेल्स मनोरंजनाचे कार्यक्रम प्रसारित करतात मग हे नवे किसान चॅनल पाहणार कोण ? यावर उपाय शोधण्यात आला असून अमिताभ बच्चनला साईन करण्यात आले आहे. त्याला ६ कोटी रुपये जाहिरातीसाठी द्यायचे सरकारने कबूल केले आहे. सरकारने अमिताभ बच्चन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून ६ कोटींचा करार केला.

दूरदर्शनच्या पॅनेलमध्ये असणाऱ्या ‘लिंटास इंडिया प्रा. लि’ या एजन्सीतर्फे सरकार व अमिताभ बच्चन यांच्या दरम्यान ३० एप्रिल २०१६ पर्यंत करार करण्यात आला आहे. या करारानुसार अमिताभ टी.व्ही, प्रिंट, इंटरनेट व सिनेमासाठीच्या ‘जाहिरातीत’ झळकणार आहेत. शेतक-यांच्या कल्याणासाठी असलेले हे चॅनेल देशातील जनतेने भरलेल्या कराच्या पैशातून उभं राहिलं असताना, फक्त जाहिरातींसाठी एवढी मोठी रक्कम खर्च झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ही रक्कम एकूण चॅनेलच्या बजेटच्या सुमारे १५ टक्के असल्याची माहितीही मिळत आहे. सोशल मीडियावरही याबाबत साधक बाधक चर्चा होत असून त्यातून अमिताभ बच्चन यांच्यावर टीकेचाच सूर अधिक उमटताना पाहायला मिळत आहे.

Leave a Comment