अ‍ॅमेझॉनची फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलला धोबीपछाड

amazon
मुंबई- ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यात ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्या यशस्वी ठरल्या असून मे महिन्यात या ऑनलाईन विक्रेत्या वेबसाईटना पहिल्यांदा भेट देणा-या ग्राहकांचा विचार करताना अमेरिकेतील ऑनलाईन विक्रीतील मोठे नाव असलेल्या अ‍ॅमेझॉनची भारतीय शाखा अ‍ॅमेझॉन इंडियाने देशातील अव्वल ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलवर मात केली आहे.

इंटरनेट विश्लेषक कंपनी कॉमस्कोअरडेटाच्या आकडेवारीनुसार, मेमध्ये अ‍ॅमेझॉन इंडियाला २.३६ कोटी ग्राहकांनी पहिल्यांदाच भेट दिली. यात किचिंत फरकाने फ्लिपकार्ट मागे पडली आहे. फ्लिपकार्टला २.३५ कोटी, तर स्नॅपडीलला १.७९ कोटी ग्राहकांनी भेट दिली. वार्षिक तुलना केल्यास अ‍ॅमेझॉनच्या ग्राहकभेटीत १४२ टक्क्यांपेक्षा मोठी वाढ झाली आहे. तर फ्लिपकार्टच्या ग्राहकांत ८० टक्के वाढ नोंदली गेली. वाढीचा दर लक्षात घेता स्नॅपडीलने ९० टक्क्यांसह फ्लिपकार्डला मागे टाकले असल्याचे या आकडेवारीत म्हटले आहे.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये फ्लिपकार्टचे यावर निर्विवाद वर्चस्व होते. गेल्या वर्षी फ्लिपकार्टला १.३ कोटी, अ‍ॅमेझॉन इंडिया आणि स्नॅपडीलमध्ये एक कोटी ग्राहकांसह तीव्र स्पर्धा राहिली होती.

ई-कॉमर्समधील वाढते स्वारस्य दर्शवण्यासाठी पहिल्यांदा भेट देणा-या ग्राहकांची आकडेवारी उपयुक्त ठरते, मात्र कंपनीच्या कामगिरीचे मोजमाप हे ग्राहक भेटीची वारंवारता आणि ऑनलाईन रिटेलर्सची संख्या यावर ठरत असल्याचे रिटेल कन्सल्टन्सी टेक्नोपॅकचे अध्यक्ष अरविंद सिंघल म्हणाले.

Leave a Comment