लवकरच ‘टपाल बँक’ला मिळणार परवाना; दूरसंचारमंत्री प्रसाद यांची माहिती

post-bank
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून येत्या ऑगस्ट महिन्यात प्रस्तावित भारतीय टपाल बँकेला परवाना मिळण्याची शक्यता असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार आणि माहिती प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. पोस्टाला बँकेचा परवाना दिल्यानंतर देशभरात पसरलेल्या १,५४००० टपाल कार्यालयाअंगर्तत लोकांना बँकिंग सेवा उपलब्ध होईल. विशेष करून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.

आम्हाला अपेक्षा आहे की, येत्या ऑगस्टपर्यंत रिझर्व्ह बँक टपाल खात्याला बँकेचा परवाना देईल. गेल्या वर्षांपासून टपाल खात्याने संगणकीकरणाच्या माध्यमातून २७,२१५ टपाल कार्यालयांना एका नेटवर्कमध्ये जोडले आहे. टपाल विभागाने बँकेच्या परवानगीसाठी भारतीय रिझव्र्ह बँकेकडे अर्ज केलेला आहे. टपाल विभागाने पोस्टाच्या आधुनिकीकरण आणि बँकिंग सेवांसाठी इन्फोसिस, टीसीएस, सिफी आणि रिलायन्ससारख्या कंपन्यांचे सहकार्य घेतले आहे. तसेच ३१ ऑगस्टला देशभरात सात राज्यांत १०० एटीएम उघडणार असल्याचे दूरसंचार मंत्री प्रसाद यांनी म्हटले आहे

टपाल विभागाने बचतीच्या अनेक योजना आधीपासूनच सुरू ठेवल्या आहेत. आता टपाल खाते आपल्या ग्राहकांना सर्वप्रकारच्या बँकिंगच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. टपाल विभाग देशभरात पसरलेल्या आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून भारतीय टपाल बँक सुरू करू इच्छित आहे. रिझव्र्ह बँकेच्या निर्देशानुसार ही बँक जनतेची मागणी जमा आणि धन प्रेषणसारखी सेवा देईल. मात्र ही बँक कर्ज उपलब्ध करून देणार नाही. सुरूवातीच्या काळात या बँकेत प्रति ग्राहक अधिकाधिक एक लाख रुपयेपर्यंत जमा रक्कम खात्यामध्ये ठेवली जाऊ शकते.

Leave a Comment