नुरजहा आंब्याचे वजन घटले

nurjahan
हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलांचा परिणाम वजनामुळे प्रसिद्ध असलेल्या नूरजहा जातीच्या आंब्यावर झाला असून यंदा या आंब्याच्या वजनात आणखी घट झाली असल्याचे उत्पादक शेतकर्याझचे म्हणणे आहे. मध्यप्रदेशातील आदिवासी बहुल अली राजपूर भागातील कठ्ठीवाडा क्षेत्रात हा आंबा होतो. यंदा या आंब्याचे वजन सरासरी साडेतीन किलो आहे व गतवर्षीच्या तुलनेत त्यात ४०० ग्रॅमनी घट झाली आहे.

उत्पादक शेतकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी आंब्याचे वजन गतवर्षीपेक्षा अधिक भरेल असा अंदाज होता मात्र झाडे उशीरा मोहरली आणि मान्सून एक आठवडा आधीच दाखल झाला. परिणामी फळे अगोदरच तयार झाली व पूर्ण क्षमतेने वाढली नाहीत. या आंब्यांची विक्री नगावरच केली जाते. त्याला मागणीही खूप असते. एक आंबा ३०० ते ५०० रूपयांत विकला जातो. आंब्याच्या वजनाने झाडे झुकतात व कांही वेळा त्यांना आधार देण्याचीही पाळी येते.

मध्यप्रदेश सरकार आंब्याची ही दुर्मिळ जात टिकवावी आणि उत्पादकांनाही त्यातून चांगली कमाई व्हावी तसेच अधिक झाडे लावण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी या जातीचे पेटंट घेण्याच्या प्रयत्नात असल्याचेही समजते. दहा वर्षांपूर्वी या आंब्याचे वजन ७ किलोपर्यंत भरत असे ते काळाच्या ओघात घटत चालले आहे आणि आज तर या भागात या जातीची कांही मोजकीच झाडे शिल्लक आहेत असेही समजते.

Leave a Comment