जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था म्हणून समोर येईल भारत

economist
न्यूयॉर्क- भारत ही जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था म्हणून येत्या १५ वर्षात समोर येईल. तर याच कालावधीत अमेरिकन अर्थव्यवस्थेला मागे टाकून चीनची अर्थव्यवस्था अव्वल स्थानी विराजमान होईल, असा अंदाज इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (ईआययू)ने आपल्या अहवालात म्हटले आहे. याच कालावधीत उदयोन्मुख बाजारपेठा या विकासदराच्या बाबतीत विकसित अर्थव्यवस्थांना मात देण्याची शक्यताही या अहवालात वर्तवण्यात आली आहे.

सध्या जागतिक अर्थव्यवस्थेचे नेतृत्व अमेरिका, जपान आणि पश्चिम युरोपच्या हाती आहे. विकसनशील देशांच्या वेगवान विकासामुळे या अर्थव्यवस्थांना मागे सारून चीन आणि भारत हे नेतृत्व स्वीकारतील, असे भाकीत या अहवालात करण्यात आले आहे.

२०२६मध्ये चीन अमेरिकेवर डॉलर मूल्यातील अर्थव्यवस्थेत मात करेल. २०५०पर्यंत चीन सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून कायम राहील. याच कालावधीत भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था ठरेल. २०५०पर्यंत सरासरी ५ टक्के विकासदरासह या स्थानी राहील, असे या अहवालात म्हटले आहे.

बाजार विनिमय दरानुसार इंडोनेशिया आणि मेक्सिको या अर्थव्यवस्था २०५०पर्यंत पहिल्या दहा अर्थव्यवस्थांमध्ये सामील होतील. यामध्ये त्या इटली आणि रशिया यांना मात देतील, असेही यात नमूद केले आहे.

Leave a Comment