गर्लफ्रेंड शोधण्यासाठी, डेटिंग करण्यासाठी सहकार्याचा हात पुढे करणारी आणि बिनबोभाट मदत करणारी अनेक अॅप आज बाजारात आहेत. मात्र आता आपल्या फोन प्ले स्टोअरमध्ये असेही एक अॅप आले आहे जे तुम्हाला केवळ ३७ सेकंदात तुमचे प्रेम हे संकट बनले असले तर त्यातून मुक्तता देऊ शकणार आहे. बिंडर नावाने हे अॅप बाजारात आले आहे.
बिंडर – ब्रेकअप सोपा करणारे अॅप
गर्लफ्रेंडपासून तुम्हाला सुटका तर हवीय पण ब्रेक अप करण्यासाठी जे कांही सांगायला हवेय ते सांगण्याची तुमच्यात हिम्मत नाही अशी परिस्थिती असेल तर हे अॅप ते काम करू शकणार आहे. हे अॅप प्रथम तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडची माहिती विचारेल. म्हणजे तिचे नांव, फोटो, फोननंबर वगैरे. त्यानंतर ३७ सेकंदात ते ऑडिओ बनवून व्हॉईसमेल अथवा टेक्स्ट मेसेज फॉर्ममध्ये तुमच्या गर्लफ्रेंडकडे पाठवून देईल. म्हणजे प्रत्यक्ष वादावादीही नको, रूसणे फुगणे, रडारडही नको. केवळ एका मेसेजने हे नको असलेले नाते खतम.
हे अॅप कांही खास पद्धतीने बनविले गेलेले नाही तर अँड्राईडच्या गर्लफ्रेंड अथवा दोस्त बनविण्यासाठी बनविल्या गेलेल्या टीन्डर या अॅपच्या बरोबर उलट बनविले गेले आहे. टीन्डर नवीन नाती, भेटीगाठी. पार्टनर शोधण्यासाठी मदत करेल तर बिंडर त्यातून सुटका करेल. सध्या हे अॅप फक्त ब्रिटनमध्ये उपलब्ध आहे आणि केवळ पुरूषांसाठीच उपलब्ध आहे. मात्र लवकरच ते महिलांसाठीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.