जगभरात एड्सबाधितांच्या प्रमाणात वाढ

hiv

प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष झाल्याचे परिणाम
युनायटेड नेशन्स एड्स आणि तज्ज्ञ समितीच्या अहवालाचा इशारा

पुणे: एड्सच्या रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच वाढविण्यासाठी अनेक प्रकारची औषधे आणि उपचारपद्धती विकसित करण्यात यश आले असले तरीही एचआयव्ही संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना विकसित करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने पाच वर्षापासून एचआयव्हीचा संसर्ग होणा-या बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रतिबंधात्मक उपायांना वेग न दिल्यास एड्स हे जगासमोर मोठे आव्हान ठरू शकते, असा इशारा युनायटेड नेशन्स एड्स आणि लॅन्सेट मेडिकल जर्नलच्या तज्ज्ञ समितीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या विश्लेषणात देण्यात आला आहे.

मागील पाच वर्षापासून वाढत असलेले एचआयव्ही बाधितांचे प्रमाण जोपर्यंत आटोक्यात येणार नाही, तोपर्यंत एड्सग्रस्तांचे मृत्यू थांबविण्याच्या अथवा लांबविण्याच्या प्रयत्नांना विशेष अर्थ रहात नाही, अशी स्पष्टोक्ती लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनचे संचालक आणि या विश्लेषणात्मक निबंधाचे लेखक पीटर पिओट यांनी केली आहे.

एचआयव्ही बाधितांचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या आफ्रिकन देशांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार यासाठी त्या देशांच्या सन २०१४ ते २०३० या कालावधीतील एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी कमीतकमी १/३ निधीची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले. आफ्रिकन देशांबरोबरच समलिंगी संबंधांचे प्रमाण मोठे असलेल्या युरोपीय देशात, तसेच आशिया आणि उत्तर अमेरिका येथील देशातही एचआयव्हीच्या प्रसाराचे आव्हान मोठे आहे.
उपलब्ध असलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार जगभरात एचआयव्ही बाधितांची संख्या ३ कोटी ५० लाख असून एड्सने आतापर्यंत चार कोटी जणांचे बळी घेतले आहेत. तीस वर्षापूर्वीपासून सुरू असलेल्या प्रयत्नांचे फळ म्हणून मागील दशकात एचआयव्ही बाधितांचे प्रमाण कमी करण्यात यश दृष्टीक्षेपात आले होते. एड्सचे उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा नव्याने लागण झालेल्या रुग्णांची संख्या घटल्याचेही दिसून आले होते. मात्र मागील पाच वर्षात एचआयव्हीने पुन्हा डोके वर काढले असून प्रतिबंधात्मक उपाय युद्धपातळीवर हाती घेण्याची आवश्यकता या प्रबंधात अधोरेखित करण्यात आली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment