करदात्यांसाठी नवी योजना; कर परतावा थेट बँक खात्यात

income-taz
नवी दिल्ली : प्राप्तीकर खात्याने आपल्या सर्व करदात्यांसाठी नवीन योजना राबविण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. या पुढे करदात्यांच्या कर परताव्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यातच जमा होणार आहे.

प्राप्तीकर खात्याकडून कर परताव्याची प्रक्रिया पूर्ण होताच ती रक्कम बँक खात्यात जमा होणार असून त्याबाबतचा एसएमएसही करदात्याला पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्ष अनिता कपूर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सध्या कर परताव्याची रक्कम संबंधित करदात्याला धनादेशाच्या माध्यमातून दिली जाते. त्यातही हा धनादेश टपाल विभागामार्फत पाठविण्यात येत असल्याने करदात्याला धनादेश मिळण्यास बराच विलंब होत असतो. यात कधी कधी करदात्यांना धनादेशही मिळत नसल्याने त्याचा मनस्ताप व्हायचा. ही पद्धत पूर्णपणे बंद करण्याची प्राप्तीकर खात्याची योजना आहे. ही योजना देशभरात राबविण्यासाठी आम्ही सर्व बँका आणि आरबीआयसोबतही चर्चा सुरू केली आहे, असे त्यांनी सांगितले.
आरबीआयने आम्हाला असे सांगितले आहे की, सध्या इलेक्ट्रोनिक माध्यमात जेव्हा विशिष्ट रक्कम दात्याच्या बँक खात्यात जमा केली जाते तेव्हा बँका केवळ त्याचा खाते क्रमांक तपासतात नावाची शहानिशा करीत नाही. धनादेशावर खातेदाराचा जो खाते क्रमांक आहे त्याच खात्यात रक्कम जमा होत असते. यामुळे अनेकांना मोठा फटका बसला असल्याचेही दिसून आले आहे. कारण, नावाची शहानिशा करण्यात न आल्याने खाते क्रमांक जर चुकीचा असेल तर अन्य दुस-याच्याच खात्यात ती रक्कम जमा होत असते.

या पार्श्वभूमीवर आम्ही या व्यवस्थेत काही सुधारणा करण्याचे ठरविले आहे. आता आम्ही अशी व्यवस्था तयार करीत आहोत जिथे करदाता जेव्हा आपला खाते क्रमांक देतो तेव्हा आधी त्याचा क्रमांक त्या बँकेशी तपासून पाहणार आहोत. तो बरोबर निघाल्यास आम्ही त्या खात्यात रक्कम जमा करू; पण क्रमांक चुकीचा असेल तर त्याचे नाव आणि क्रमांक दोन्ही तपासूनच आम्ही रक्कम खात्यात जमा करणार आहोत, असेही त्या म्हणाल्या.