अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची मागणी घटली

engineering

यावर्षी पुणे विभागात सुमारे ६० टक्के जागा राहणार रिकाम्या

पुणे : एकेकाळी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांना विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून मोठी मागणी असे. मात्र बदलत्या काळात अन्य पर्याय उपलब्ध होत असल्याने; तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला जाणा-या विद्यार्थ्यांमध्ये उल्लेखनीय घट झाली आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या जागांपैकी केवळ ४३ टक्के जागांसाठीच पुणे विभागातील विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यावर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ६० ते ६५ टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यवस्थापन अभ्यासक्रमापाठोपाठ अभियांत्रिकी महाविद्यालये बंद होण्याची शक्यता आहे.

पुणे विभागात अभियांत्रिकी पदवीसाठी ५८ हजार ७९० जागा उपलब्ध आहेत. पुणे विभागात केवळ २५ हजार ८३ विद्यार्थ्यांनीच अर्ज केले आहेत. उपलब्ध जागांच्या तुलनेत प्रवेश अर्जांची संख्या घटली आहे. अर्ज केलेले सर्व विद्यार्थी प्रवेश घेत नाहीत. बहुतांश विद्यार्थी आयआयटीकडे वळतात. त्यामुळे विद्यार्थी संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे.

राज्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची ३७६ महाविद्यालये आहेत. त्यातील १२१ महाविद्यालये पुणे विभागात आहेत. सुविधा न देणाऱ्या किंवा प्रसिद्धी नसलेल्या महाविद्यालयांना यावेळी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतुन पुरेसे विद्यार्थी मिळणे कठीण आहे. यावर्षी विभागात ६५ ते ७० टक्के जागा रिक्त राहतील, असे तंत्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Comment