१० दिवसांत परत करा २००५ पूर्वीच्या नोटा

notes
नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँकेने २००५ पूर्वीच्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या चलनी नोटा परत करण्यासाठी ठरवून दिलेली मुदत संपण्यासाठी आता शेवटचे १० दिवसच उरले आहेत. ज्यांच्याकडे या नोटा असतील, त्यांनी ३० जूनपर्यंत बँकांना परत कराव्यात, असे आवाहन आरबीआयतर्फे करण्यात आले आहे.

२००५ पूर्वीच्या या नोटा चलनातून बाद करण्यात येणार असल्याने नागरिकांनी ठरावीक अवधीतच त्या परत करून सहकार्य करावे. लोक या नोटा आपले खाते असलेल्या बँकेत किंवा घराजवळच्या कोणत्याही बँकेत परत करू शकतात, असे आरबीआयने म्हटले आहे.

जुनाट नोटा परत करण्यासाठी आरबीआयने यापूर्वी १ जानेवारी ही अंतिम तारीख निश्‍चित केली होती. तथापि, लोकांना सोयीचे व्हावे यासाठी नंतर ही मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली होती. या नोटा बँकांमध्ये बदलविताना नागरिकांना त्याचे संपूर्ण मूल्य परत मिळणार आहे.

२००५ पूर्वीच्या नोटा ओळखणे अतिशय सोपे आहे. कारण, या चलनावर मागील बाजूला मुद्रणाची तारीख दिलेली नाही. तर, २००५ नंतर जारी करण्यात आलेल्या नोटांवर मागील बाजूला सर्वात खाली मुद्रणाची तारीख स्पष्टपणे दिसून येते.

Leave a Comment