मानवाचे अस्तित्व येणार धोक्यात; अमेरिकन शास्त्रज्ञांचे नवे संशोधन !

science
न्यूयॉर्क : नजिकच्या भविष्यात मानवाच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न होऊ शकतो, असा इशारा एका अभ्यास गटाने दिला आहे. जगामध्ये सध्या सहावी सामूहिक नष्ट प्रक्रिया सुरू आहे. याबाबतचे संशोधन सायन्स अ‍ॅडव्हान्सेस या संशोधन पत्रिकेत देण्यात आले आहे. यामध्ये नमूद केलेल्या संशोधनानुसार अलिकडच्या काळात सामान्यपणे पूर्वीच्या तुलनेत १०० पट वेगाने प्रजाती नष्ट होत आहेत. याला मानवही अपवाद राहणार नाही, असे संशोधनात पुढे आले आहे.

आतापर्यंत जगाने अशा प्रकारच्या ५ सामूहिक नष्ट प्रक्रिया अनुभवल्या आहेत. त्यामध्ये सर्वांत शेवटच्या प्रक्रियेत ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी डायनासोर पृथ्वीतलावरून नष्ट झाले. सध्या आपण यातील सहाव्या सामूहिक नष्ट प्रक्रियेतून जात आहोत. यामध्ये शंका घेण्याचे काहीच कारण नाही, असे या संशोधनामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे. स्टॅनफोर्ड वुडस इन्स्टिट्यूट फॉर दे एनव्हारयमेंट संस्थेतील या संशोधनातील वरिष्ठ संशोधक पाऊल एहर्लिच यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. विद्यामान नष्ट प्रक्रियेच्या लाटेत मानव प्रजात नष्ट होईल, असा इशाराच देण्यात आला आहे. ही प्रक्रिया सुरूच राहिली तर यामध्ये नष्ट होणा-या प्रजातीत मानवाचा क्रमांक वरचा असेल, असे या संशोधनाचे प्रमुख गेरार्डो सेबलॉस म्हणालेत. काही संशोधकांनी मात्र याला आव्हान दिले आहे. अशा प्रकारच्या संशोधनामध्ये अनेक अतिशयोक्ती केल्या असल्याचे काही संशोधकांचे मत आहे.

जीवाश्माच्या अभ्यासावरून या शास्त्रज्ञांना वाटते की, सध्याची परिस्थिती आणि यातील प्रजाती चिवट आहेत. त्यांचे नष्ट होण्याचे प्रमाण आधीच्या तुलनेत कमी आहे तसेच स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याचे या संशोधकांना वाटते. नष्ट होण्याच्या उंबरठ्यावरली प्रजातींचा विचार केल्यास सध्या ४१ टक्के उभयचर प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याच वेळी २६ टक्के प्राणी प्रजाती झपाट्याने नष्ट होत आहेत. इंटरनॅशनल युनियन फॉर काँझर्वेशन ऑफ नेचर या संस्थेनेच ही आकडेवारी दिली आहे. ही संस्था नष्ट होणा-या प्रजातींचा अभ्यास करणारी जगातली मान्यताप्राप्त संस्था आहे. या संशोधनामुळे जगभर खळबळ उडाली आहे.

Leave a Comment