आता समुद्रात होणार वीजनिर्मिती

power
नवी दिल्ली : वीज क्षेत्र सशक्त बनविण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकार असून, त्यांनी समुद्रात विंड एनर्जी फॉर्म बसवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. २०२२ पर्यंत संपूर्ण देशात २४ तास वीज उपलब्ध करून देण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी सरकार नव्या स्रोतांचा शोध घेत आहे. विंड एनर्जी फॉर्मच्या निर्मितीसाठी केंद्रीय नवीन तथा नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय यासंबंधीचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठविण्याचा विचार करीत आहे.

विंड एनर्जी दोन पद्धतीची असते. त्यात एक ऑनशोर आणि दुसरा ऑफशोर असून समुद्राच्या काठावर रिकाम्या जागेत टरबाईन लावून जी पवन ऊर्जा निर्मिती केली जाते, त्याला ऑनशोर विंड एनर्जी असे म्हणतात. या माध्यमातून आतापर्यंत २० हजार मेगावॅटपेक्षा अधिक वीज उत्पादन होते. २०३१ पर्यंत ते १ लाख ९१ हजार मेगावॅटपर्यंत जाईल, असा सरकारचा अंदाज आहे. आता केंद्रीय मंत्रालयाने समुद्राच्या आत टरबाईन लावून पवन ऊर्जेचे उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याला ऑफशोर विंड एनर्जी असे म्हणतात. यासाठी मंत्रालयाने ग्लोबल प्रॅक्टिसच्या आधारावर तज्ज्ञांच्या सहकार्याने नवे धोरण तयार केले आहे. ऑफशोर विंड एनर्जीबाबत आम्ही उत्सुक असून, पुढील वर्षापर्यंत लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, असे या मंत्रालयातील अधिका-यांचे म्हणणे आहे. त्यासाठी यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच कॅबिनेटसमोर ठेवण्यात येईल आणि मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच त्याचे काम सुरू करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

Leave a Comment