भारतीयांना हाँगकाँगमध्ये व्हिसा फ्री एंट्री सुरू राहणार

hongkong
हाँगकाँग सरकारने भारतीयांना हाँगकाँगमध्ये व्हीसा फ्री प्रवेश देण्याची योजना यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. हाँगकाँग सरकारने भारतातून हाँगकाँगमध्ये येऊन आश्रय घेणार्‍यांच्या संख्येत होत असलेली वाढ गंभीरपणे घेतली होती व त्यामुळे व्हिसा फ्री एंट्री स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता मात्र हाँगकाँगमध्ये स्थायिक असलेले भारतीय उद्योजक आणि भारतीय अधिकार्‍यांनी सरकारच्या या निर्णयाचा विपरित परिणाम दोन्ही देशातील पर्यटन, व्यापार व व्यवसायावर होणार असल्याचे सरकारला पटवून दिल्याने व्हीसा फ्री सुविधा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला गेला असे समजते.

हाँगकाँगमध्ये फारच थोड्या देशांना व्हीसा फ्री एंट्री आहे आणि त्यात भारताचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारतात येण्यासाठी हाँगकाँगवासियांना व्हीसा घ्यावा लागतो. त्याबाबतही हाँगकाँग सरकारने नाराजी व्यक्त केली होती. हाँगकाँग आणि मकाऊ १९९७ पासून स्वतंत्र प्रशासन झाल्यानंतरही भारताची ही व्हीसा फ्री सुविधा सुरूच ठेवली गेली आहे. मात्र आजकाल भारतातून येथे येऊन आश्रय घेणार्‍यांची संख्या फारच वाढली आहे आणि त्यांच्याशी डील करण्यात सरकारला बराच पैसा खर्च करावा लागतो असे हाँगकाँग भारत चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक व माजी अध्यक्ष एम. अरूणाचलम यांनी सांगितले.

Leave a Comment