धक्कादायक… देशात वाढते आहे मनोरुग्णांची संख्या

dipreation
पुणे – आपल्या देशात मानसिक रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्येक पाच भारतीयांपैकी एकाला एखादा तरी मानसिक आजार असल्याचे नॅटहेल्थ या आरोग्य संघटनेचे सरचिटणीस अंजन बोस यांनी म्हटले आहे. ही संघटना सांगता न येणार्‍या रोगांविषयी काम करते.

मानसिक रोगांमुळे अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान होत असून, २० ते ४० वर्षे या वयातील युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात अशाप्रकारचे आजार आढळून येत आहेत. २०१२ ते २०३० या कालावधीत एकमेकांना सांगता न येणार्‍या आजारांमुळे अर्थव्यवस्थेला २० टक्क्यांपर्यंतचा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. नुकसानीची आकडेवारी साडेसहा अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड आहे. मानसिक आजारावरील औषधे, डॉक्टरांचे शुल्क, रुग्णालये आणि इतर शुल्क हा या रोगांवरील थेट खर्च असून, रोगांमुळे उत्पादनक्षमतेत घट झाल्यानेही अप्रत्यक्षपणे खर्च केला जातो. अशा रोगांमुळे बेरोजगारी, शारीरिक अपंगत्व, गुन्हेगारी वृत्ती, आत्महत्या, अशा रुग्णांचा सांभाळ करणार्‍यांच्या उत्पादनक्षमतेत होणारी घट, असे आणखी काही अप्रत्यक्ष खर्चही आहेत. मानसिक आजारातील वाढ हा एक चिंतेचा विषय असून, या रोगांविषयी जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे बोस यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment