भारत अतिश्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानावर

rich
न्यूयॉर्क : बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या ताज्या अहवालात भारत १० कोटी डॉलर्स किंवा त्यापेक्षा अधिक संपत्ती असणा-या कुटुंबाच्या संख्येच्या मानाने चौथ्या स्थानावर असून या यादीत अमेरिका अव्वलस्थानी असल्याची माहिती दिली आहे.

चीन आणि भारताचा आर्थिक विकास कायम राहण्यासाठी एशिया-प्रशांत क्षेत्रातील लोकांच्या संपत्तीत वाढ होत आहे. गेल्या वर्षी अमेरिकेत अल्ट्रा हाय नेटवर्क असलेल्या कुटुंबीयांची संख्या ५ हजार ३०२ एवढी आहे. याबरोबरच चीनमध्ये १,०३७, ब्रिटेनमध्ये १,०१९, भारतात ९२८ आणि जर्मनीमध्ये ६७९ आहे. भारतात श्रीमंत कुटुंबीयांची संख्या २०१३ मध्ये २८४ होती. परंतु वर्षभरात त्यात तिप्पट वाढ झाली आहे. या अहवालात एशिया-प्रशांत क्षेत्रात खाजगी संपत्तीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केवळ २०१४ मध्येच संपत्तीत २९ टक्के वाढ झाली असून, ती ४७ हजार अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे युरोपला मागे टाकत हा भाग जगातील दुस-या क्रमांकाचे श्रीमंत क्षेत्र बनले आहे. एशिया-प्रशांत (जपान वगळून) क्षेत्र पुढील वर्षी म्हणजेच २०१६ मध्ये ५७ हजार अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल आणि उत्तर अमेरिकेच्या ५६ हजार अब्ज डॉलर्स संपत्तीला मागे टाकेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याच पद्धतीने खाजगी संपत्तीचा विकास होत गेल्यास एशिया-प्रशांत क्षेत्र उत्तर अमेरिकेला मागे टाकू शकते. सध्या उत्तर अमेरिका सर्वांत संपन्न क्षेत्र म्हणून ओळखली जाते. हीच बिरुदावली भविष्यात आशिया-प्रशांत क्षेत्राला लागू शकते. विशेष म्हणजे २०१९ पर्यंत एशिया-प्रशांत क्षेत्राकडे वैश्विक पातळीवर खाजगी संपत्तीचा वाटा तब्बल ३४ टक्क्यांवर पोहोचू शकतो, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. वार्षिक १० टक्के वाढीचा वेग राहिल्यास एशिया-प्रशांत क्षेत्रातील खाजगी संपत्ती २०१९ पर्यंत ७५ हजार अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. भारत आणि चीनच्या आर्थिक विकासाचा वेग अधिक असल्याने एशिया-प्रशांत क्षेत्रात संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यातही चीन आणि भारतातील खाजगी संपत्तीची वाढ प्रामुख्याने स्थानिक शेअर बाजारातील गुंतवणुकीतून मिळणा-या लाभातून वाढत आहे.

Leave a Comment