नथुल्ला मार्गे कैलास यात्रा – सुषमांनी दाखविली हरी झंडी

kailas
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी तिबेटमधील कैलास मानसरोवर यात्रेसाठी नवीन नथुल्ला मार्गाने जाणार्‍या यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखविला. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सप्टेंबरच्या भेटीच्या वेळी नथुल्ला मार्गे कैलास मानसरोवर यात्रेला भारतीय यात्रेकरूंना परवानगी संबंधी घोषणा केली होती. हा नवीन रस्ता समुद्रसपाटीपासून ४ हजार मीटर उंचीवरून जातो मात्र तो यात्रेकरूंसाठी अधिक सोयीचा आणि आरामदायी आहे कारण हा थेट वाहनमार्ग आहे.

यापूर्वी चीनहद्दीत येणार्‍या कैलास मानसरोवर यात्रेसाठी उत्तराखंडमधील लिपूलेक पासमधून रस्ता होता. या रस्त्यानेही यात्रेकरू जात आहेत मात्र हा रस्ता अतिशय खडतर असल्याने वृद्ध यात्रेकरू येथून जाऊ शकत नाहीत. नवीन मार्गामुळे वृद्ध यात्रेकरूही कैलासाचे दर्शन घेऊ शकणार आहेत. यात्रा उद्घाटन करताना सुषमा स्वराज म्हणाल्या, दोन कारणांनी मला विशेष समाधान वाटते आहे. पहिले म्हणजे वृद्ध यात्रेकरूंना या यात्रेसंदर्भात दिलेले आश्वासन पूर्ण झाले आहे तसेच त्यांच्या चेहर्‍यावर दिसणारा आनंद हे मोठे समाधान आहे. नवीन मार्ग उपलब्ध झाला नसता तर वृद्ध ही यात्रा कधीच करू शकले नसते.

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदींच्या परदेशगमनावरून वादाच्या भोवर्‍यात सापडल्या नंतर सुषमा स्वराज यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता. नथूला मार्गाने प्रत्येकी ५० यात्रेकरू असलेल्या ५ तुकड्या जाणार आहेत तर पूर्वीच्या मार्गाने प्रत्येकी ६० यात्रेकरू असलेल्या १८ तुकड्या यात्रा करणार आहेत.

Leave a Comment