कंपनी कायद्यातील बदल व्यवसायाला उत्तेजन देणारे

business
पुणे – ‘कंपनी कायदा २०१३ तील बदलांमुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना व्यवसाय करणे अधिक सोपे होणार आहे. सरकारने या कायद्यात जे बदल केलेत ते बदल स्वागतार्ह आहे. कंपनी कायद्यातील हे बदल विविध प्रकारच्या व्यवसायांना उत्तेजन देणारे आहे. ’, असे मत सीए सुनील पाटोदिया (अध्यक्ष, डब्ल्यूआयआरसी ऑफ आयसीएआय) यांनी व्यक्त केले. इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्या पुणे शाखा व्यवस्थापकीय समितीच्या वतीने ‘लेखा परिक्षण’ या दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने ते बोलत होते.

या दोन दिवसीय परिसंवादात प्रामुख्याने १९५६ साली अस्तित्वात आलेल्या ‘कंपनी कायदा १९५६ यातील व्यवहार, जुन्या कायद्याबाबत करण्यात आलेले अनेक बदल, कायद्यात केलेले बदल समजून घेणे, नवीन कायद्याबाबत जनजागृती करणे व मुख्यत्वे करून कॉर्पोरेट धोरणांबाबत चर्चेच्या माध्यमातून नवीन उपाय सुचवणे याविषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी कंपनी कायदा २०१३ मध्ये कर्जाविषयक आवश्यक तरतुदी, ठेवी आणि संबंधित व्यवहार, शेड्युल टू बाबतच्या घसाऱ्याची कंपनी कायद्यानुसार पडताळणी, ऑडिटसंबंधी अकाउंटिंग स्टॅण्डर्ड उपयोगात आणणे, सामान्यत: आर्थिक अहवालाची तपासणी व त्याचे दस्तऐवजीकरण, एसए ७०० व सीएआरओ २०१३ (लेखापरीक्षण अहवालातील नवीन बाबी), कराबाबतचे मुद्दे, चॅरिटेबल विश्वस्तव्यवस्था यांचा अहवाल, सहकारी अधिनियमानुसार लेखापरीक्षण करण्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदींवरही चर्चा करण्यात आली.
या परिसंवादाच्या निमित्ताने बोलताना सीए सुनील पाटोदिया पुढे म्हणाले,’ नविन कायद्याबाबत तज्ज्ञ समितीने कायद्यात असणाऱ्या बारकाव्यांचा सखोल अभ्यास करून त्यावर विकसित कायदा तयार केला आहे. हा कायदा पूर्णपणे नवा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सरकारच्या वतीने यासंदर्भात समितीही नेमण्यात आली आहे. ही समितीने निर्धारित केलेल्या कंपनी कायद्यामध्ये बदलांची पडताळणी करेल. त्यामुळे या कायद्याने लहान व मोठ्या उद्योगांना व्यवसायवाढीसाठी पोषक वातावरण मिळेल.

यापुर्वीही इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने वेळोवेळी कंपनी कायद्यात लहान व मोठ्या उद्योगांना व्यवसायवाढीसाठी बदल सुचवले होते. या बदलांचीही दखल या कायद्यात घेण्यात आली आहे.

अनेक नवीन बदल व संकल्पनांसह जागतिकीकरणाला डोळ्यांसमोर ठेवून छोट्या, मोठ्या अशा सर्वच उद्योगांचा यात समावेश करण्यात आला आहे. कंपनी कायदा २०१३ मध्ये करण्यात आलेल्या बदलांबाबत ऑडिटिंगमुळे नफा न कमावणाऱ्या संस्था, विविध नवीन शेड्यूल्सला चार्टर्ड अकाउंटंट्स व ऑडिटर्स योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतील. असे विचार बैठकीत सीए क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी व तज्ज्ञांनी मांडले.

यावेळी सीए सुनील पाटोदिया (अध्यक्ष, डब्ल्यूआयआरसी ऑफ आयसीएआय) यांच्या हस्ते या बैठकीचे उद्घाटन करण्यात आले. सीए एस. बी. झावरे (केंद्रीय कार्यकारणी सदस्य, आयसीएआय), सीए दिलीप आपटे (उपाध्यक्ष डब्ल्यूआयआरसी ऑफ आयसीएआय), सीए सुश्रुत चितळे (सचिव, डब्ल्यूआयआरसी ऑफ आयसीएआय), सीए सर्वेश जोशी व एस. जी. मुंदडा (प्रादेशिक कार्यकारणी सदस्य, डब्ल्यूआयआरसी), सीए यशवंत कासार (अध्यक्ष, पुणे आयसीएआय), सीए सचिन परकाळे (उपाध्यक्ष, पुणे आयसीएआय), सीए राधेश्याम अग्रवाल (सचिव, पुणे आयसीएआय), सीए आनंद जखोटिया (खजिनदार, पुणे आयसीएआय), सीए जगदीश धोंडगे, सीए मंगेश किनरे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment