चिनी दुकानात चिन्यांनाच नो एंट्री

bijing
ग्राहकांची पावले आपल्याच दुकानाकडे वळावीत म्हणून दुकानदार वेगवेगळ्या शक्कल लढवित असतात असा सर्वसाधारण अनुभव आहे. मात्र चीनची राजधानी बिजिंग येथल्या एका फॅशन स्टोअर्सने ग्राहकांचे समाधान हेच आमची कमाई वगैरे सिद्धांत धुडकावून लावले आहेत. विशेष म्हणजे या चिनी दुकानाने दुकानाबाहेरच स्टाफ सोडून अन्य चिन्यांना दुकानात प्रवेश नाही असा बोर्डचा लावला आहे. मात्र त्यामुळे चिनी वेबसाईट वाईबो डॉट कॉमवर या दुकानाचा निषेध करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बिजिंग याबाओ रस्त्यावर हे फॅशन स्टोअर्स आहे. हा भाग मुळातच क्रिमी लेयरच्या ग्राहकांसाठी आहे आणि येथे परदेशी ग्राहकांचे प्रमाणच अधिक असते. त्यातही रशिया व ईस्टर्न युरोपमधील पर्यटक येथे मुद्दाम खरेदीसाठी येतात. दुकानातील कर्मचार्‍याने दिलेल्या माहितीनुसार चिनी ग्राहक विक्रेत्यांना हैराण करतात. महिला तासन तास कपडे पाहतात पण खरेदी करत नाहीत. त्यातही दुकानमालकाला एका परदेशी पर्यटकाचे वॉलेट चोरी झाल्याबद्दल ५ हजार डॉलर्स दंड भरावा लागला. सीसीटिव्हीत असे दिसले की एका चिनी ग्राहकानेही ही चोरी केली होती. त्यामुळे चिन्यांना दुकानात प्रवेश बंदीचा निर्णय घेतला गेला.

अंतरकी बात म्हणून असेही सांगितले जात आहे की हे दुकान फॅशन स्टोअर्स आहे. कपडे पाहण्याच्या निमित्ताने चीनी ग्राहक येथे येतात आणि कपड्याच्या फॅशन कॉपी करून बाहेर स्वस्तात कपडे विकतात म्हणून ही आयडिया वापरली गेली आहे. कांहीही असले तरी वाईबो डॉटकॉम वर चिनी युजरनी या दुकानावर टीकेची झोड उठविली असून चिन्यांना बंदी आहे तर चीनबाहेर दुकान चालवा अशी प्रतिक्रिया दिली आहे. न जाणो दुकानमालकाचा हा प्रसिद्धी स्टंटही असू शकतो.