८०० वर्षे जुनी बुद्धमूर्ती चीनमध्ये आढळली

buddha
चोंगकिंग – गौतम बुद्धाची ८०० वर्षे जुनी मूर्ती चीनच्या चोंगकिंग प्रांतात झालेल्या उत्खननात आढळून आली आहे. ‘कियानशाऊ ग्वायिन’ असे या मूर्तीचे नाव असून खंडित मूर्तीला आता पूर्ण रूप देण्यात आले असून, तिच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

पुरातत्त्व खात्याच्या संशोधकांना एक हजार हात असलेली ही मूर्ती बाहेर काढण्यासाठी तब्बल सात वर्षे लागली. आता ही मूर्ती पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. मूर्तीचे उत्खनन करण्याचे अभियान २००८ मध्ये सुरू झाले आणि त्यावर साठ दशलक्ष युआन म्हणजे दहा लाख डॉलर्सचा खर्च करण्यात आला. उत्खननाच्या विविध टप्प्यांमध्ये संशोधकांना ८३० हात आणि त्यातील २२७ अस्त्र-शस्त्रे सापडली. त्यांची पूर्ण स्वच्छता केल्यानंतर, सोन्याचा मुलामा देऊन एकसंध मूर्ती तयार करण्यात आली आहे. उत्खनन आणि त्यानंतरच्या प्रक्रियेचा समावेश असलेला हा उपक्रम ऐतिहासिक ठरला आहे.

सौंदर्यीकरणानंतर कियानशाऊ ग्वायिन ही मूर्ती आता ५० वर्षे चकाकणार असून, मूर्तीला आता कसलाही धोका नसल्याचे या उपक्रमाचे प्रमुख आणि चीनच्या सांस्कृतिक वारसा विभागाचे संशोधक झान चांगफा यांनी स्पष्ट केले आहे.

ही मूर्ती ७.७ मीटर उंच आणि १२.५ मीटर रूंद आहे. तिची निर्मिती ‘सदर्न सांग’ राजवटीत ११२७ ते १२७९ दरम्यान झाली असावी, असा संशोधकांचा दावा आहे. विविध दगडांमध्ये कोरीव काम करून आणि ते सुटे भाग जोडून ही मूर्ती तयार करण्यात आली असावी, असे मत चांगफा यांनी मांडले आहे. युनेस्कोने १९९९ मध्ये या स्थळाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला होता.

Leave a Comment