योगदिन आणि अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट

terrorist
नवी दिल्ली – २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संपूर्ण जगाने ठरविले असताना, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन यासारख्या दहशतवादी संघटनांच्या या योगदिनावर हल्ल्याचे सावट पसरले आहे, असा धक्कादायक अहवाल आयबीसह अन्य गुप्तचर संस्थांनी दिला आहे.

अतिरेक्यांच्या निशाण्यावर विशेषत: राजधानी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय योगदिन आहे. या समारंभात विघ्न आणण्यासाठी जम्मू-काश्मिरातील नियंत्रण रेषेवरून अतिरेक्यांना भारतात पाठविण्याची कुटील योजनाही या दहशतवादी संघटनांनी तयार केली आहे. सीमेवरील पाकव्याप्त काश्मिरात अनेक शिबिरांमध्ये दहशतवादी घुसखोरीसाठी सज्ज आहेत. यात तोयबाचे ३०, जैशचे २० आणि हिजबुलच्या १० ते १२ अतिरेक्यांचा समावेश आहे. संघर्षविरामाचे उल्लंघन करून या अतिरेक्यांच्या घुसखोरीचा मार्ग सुकर करण्याचा पाकचा प्रयत्न आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात काही अतिरेक्यांनी राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये टेहळणीही केली होती. याशिवाय, पूंछ, कुपवाडा, बारामुल्ला या भागांमधूनही घुसखोरी शक्य आहे का, हे तपासण्याचा प्रयत्न अतिरेकी गटांनी केला होता. घुसखोरीसाठी अतिरेक्यांचे दोन गट तयार असून, यातील एक गट दिल्लीपर्यंत जाईल आणि योगदिन समारंभात आत्मघाती हल्ला करेल. तर, दुसरा गट याच महिन्यात सुरू होणार्‍या अमरनाथ यात्रेच्या काळात हल्ले करेल, अशी ही योजना आहे. विशेष म्हणजे, मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिझ सईद याच्याच आदेशावरून ही योजना तयार झाली असल्याचे यात नमूद आहे.

Leave a Comment