आजपासून बीएसएनएलची मोबाईल रोमिंग फ्री सुविधा

bsnl
नवी दिल्ली : आजपासून भारत संचार निगम लि.ने (बीएसएनएल) देशभरातील १० कोटी ग्राहकांना रोमिंग फ्री सेवा देण्यास सुरुवात केली आहे. या सेवेमुळे बीएसएनएलचे देशभरातील ग्राहक विनाशुल्क रोमिंग कॉल करू शकतात.

अनेक दूरसंचार कंपन्यांनी रोमिंग फ्री मोबाईल सेवा देण्याची आतापर्यंत घोषणा केलेली असली, तरी रोमिंग फ्री मोबाईल सेवा देणारी बीएसएनएल ही पहिली कंपनी ठरली आहे. या सेवेमुळे आता बीएसएनएलचे ग्राहक आजपासूनच रोमिंग फ्री सेवेचा लाभ घेऊ शकतात. यासंदर्भात माहिती देताना बीएसएनएलचे सीएमडी अनुपम श्रीवास्तव म्हणाले की, केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी २ जून रोजीच बीएसएनएलची रोमिंग फ्री सेवा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ही सेवा उद्यापासून प्रदान करण्यात येत आहे. याचा फायदा जुने आणि नव्या ग्राहकांना घेता येणार आहे. याबरोबरच बीएसएनएलच्या ग्राहकांना आता एकापेक्षा अधिक सीमकार्ड घेऊन देशाच्या या कोप-यातून दुस-या कोप-यात जाण्याची अजिबात गरज पडणार नाही.
बीएसएनएलच्या मोफत रोमिंग सेवेबद्दल नुकत्याच झालेल्या एका बैठकीत दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) प्रश्न उपस्थित केला होता आणि कोणाच्या परवानगीने ही सेवा सुरू केली जात आहे, असे म्हटले होते. यावर श्रीवास्तव यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांच्या आदेशानुसार ही सेवा सुरू केली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ट्रायच्या आक्षेपाचा प्रश्नच उद्भवत नाही. आता या अगोदर केलेल्या घोषणेनुसारच आजपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

Leave a Comment