२० जूनला पाटबंधारे अभियंत्यांची जळगावात कार्यशाळा – जलसंपदामंत्री

girish-mahajan
जळगाव – येत्या २० जून रोजी जैन हिल्स येथे राज्यातील जलसंपदा विभागातील वरिष्ठ अभियंत्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात दिली.

राज्याचे, नवीन सरकारचे सिंचनाच्या विषयावर ‘व्हीजन’ काय, अधिकार्‍यांकडून काय अपेक्षा आहेत, पुढील काम कसे असावे आदी बाबींवर चर्चा करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात जलतज्ज्ञ माधवराव चितळे, मध्यप्रदेशचे प्रधान सचिव आदी तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करतील.

या कार्यशाळेस राज्यभरातील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, कार्यकारी संचालक, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता उपस्थित राहणार आहेत.तापीचे पाणी वाहून जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला असता जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले की, बोदवड, जामनेर, पाचोरा या दुष्काळी भागात कॅनॉलने पाणी पोहोचविण्यासाठी सर्वेक्षण सुरू असून लिफ्ट योजना करून या कॅनॉलद्वारे पाणी देण्याची योजना आहे. तसेच नवीन योजना सुरू करण्याऐवजी जुनेच अपूर्ण प्रकल्प दोन-तीन वर्षात पूर्णत्वास नेले जातील, असेही महाजन यांनी यावेळी सांगितले.