डहाणूत जन्माला आलेले आगळेवेगळे बाळ

baby
पालघर – एका महिलेने डहाणूच्या सायवान येथे विचित्र बाळाला जन्म दिला असून या मातेची सातव्या महिन्यातच प्रसुती झाली आहे. प्रसुतीनंतर ११ दिवस उलटूनही हे बाळ सुदृढ आहे.

बाळ जन्माला आल्यानंतर साधारणत: त्याला मान धरायला किमान ३ महिने तरी लागतात. मात्र सायवान येथे जन्मलेले हे बाळ जन्मापासूनच आपली मान पेलत आहे हे विशेष. हे बाळ दिसायला एखाद्या वयस्क व्यक्तीसारखे दिसते. या बाळाची त्वचा थोडीशी सुरकुतलेली आहे. या बाळाला नक्की काय झाले आहे, याचे निदान अद्याप झालेले नाही. हे बाळ दिसायला एकदम वेगळे असून त्याला पाहण्यासाठी परिसरातील लोक गर्दी करत आहेत.

baby1

बाळाची शरीर रचना अगदी वेगळी असून त्याची उंची साधारण अर्धा फुटच आहे. दिसायला हे बाळ एखाद्या म्हाताऱ्या माणसासारखे असून त्याची आई त्याला दूध पाजायला घाबरते. त्यामुळे मागील ११ दिवसांपासून या बाळाचे आजोबा त्याला बकरीचे दूध पाजत आहेत. आजोबने या बाळाच्या संगोपनाची जबाबदारी मोठ्या धीराने स्विकारली आहे.

ज्या सायवान ग्रामीण रुग्णालयात या मातेची प्रसुती झाली ते वैद्यकीय अधिकारीसुद्धा याबाबत आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्यांनी प्रसुतीनंतर या केसला सिलवासा येथील दवाखान्यात पुढील उपचारांसाठी पाठविले. मात्र तेथेही या बाळाला घरी न्या एवढाच सल्ला डॉक्टर देऊ शकले.

शनिवारी रात्री दहाच्या सुमारास या बाळाला परेलच्या वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळ असे का जन्माला आले हे कोणालाच समजत नसल्याने त्याला उपचारांसाठी वाडिया रुग्णालयात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या बाळावर येथे मोफत उपचार करण्यात येणार आहेत. त्याच्यासाठी एनआयसीयूमध्ये एक बेड राखीव ठेवण्यात आले आहे. बाळाच्या डोक्याच्या, पोटाच्या तयेच रक्ताच्या काही तपासण्या करण्यात येतील आणि त्यानंतर निदान करण्यात येईल अशी माहिती रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी दिली.

Leave a Comment