लग्झरी, हायएंड सायकल निर्मितीकडे पंजाबची वाटचाल

cycle
सायकल उत्पादनात देशातील प्रमुख केंद्र असलेल्या पंजाब मधील उत्पादकांनी देशी सायकलची घटत चाललेली निर्यात आणि देशाच्या बाजारपेठेतही होत असलेला कमी खप लक्षात घेऊन लग्झरी आणि हायएंड सायकल उत्पादनासाठी कंबर कसली आहे. सध्या या बाजारपेठेवर चीनचे वर्चस्व असून ते मोडून काढण्यासाठी हे उत्पादक आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन विकासावर अधिक भर देऊ लागले आहेत. हाय एंड सायकलींना जगभरातूनच मोठी मागणी आहे आणि त्यांच्या किमतीही २० हजारापासून दीड लाख रूपयांपर्यंत आहेत.

युनायटेड सायकल अॅन्ड पार्टस मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष चरणजित सिंह यावेळी म्हणाले, जगातच हायएंड सायकल वापराचा ट्रेंड जोरात आहे. भारतासह जगभरातून या सायकलींना मोठी मागणी आहे. या क्षेत्रातील बड्या कंपन्या भारतात स्टोअर्स उघडत आहेत. या सायकलींसाठी कार्बन आणि अन्य मेटेरियलचा वापर केला जातो त्यामुळे त्यांच्या किंमतीही अधिक असतात. आज या सायकलींसाठी येणारे सुटे भाग चीनमधून आयात केले जातात. मात्र पंजाबी उत्पादक हे सुटे भाग स्वतःच बनविणार असून येत्या २ वर्षात या सायकली भारतात पूर्णपणे तयार होतील आणि त्या निर्यातही केल्या जातील. युरोपियन बाजारात त्यासाठी आम्ही संधी शोधत आहोत.

या सायकलींसोबतच लहान मुलांसाठीच्या फॅन्सी आणि ट्रेंडी सायकली तसेच स्टायलीश व आकर्षक सायकलीही येथेच बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे. सायकल मार्केटमध्ये या सायकलींचा वाटा ४० ते ५० टक्के आहे त्यामुळे ही मोठी संधी आहे. नवीन प्रकारच्या सायकल निर्मितीसाठी उत्पादकांना प्रशिक्षण कार्यक्रमाचाही लाभ करून दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment