खरंच… तुमचा कुत्रा तुमच्याशी एकनिष्ठ आहे!

dog
टोकियो : माणसाचा सगळ्यांत जवळचा मित्र कुत्रा असतो, असे म्हणतात…यावर आणखी एकदा शिक्कामोर्तब करणारे एक संशोधन जपानमधील क्योटो विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केले आहे. या संशोधनानुसार, आपल्या मालकाच्या सामाजिक आणि भावनिक संवादानुसार श्वानही स्वत:ची वागणूक बदलतात. आपल्या मालकास मदत करण्यास नकार देणा-याकडून कुत्री अन्नही स्वीकारत नाहीत, असे निरीक्षण या संशोधकांनी नोंदविले आहे. सामाजिक सहकार्याची भावना असणा-या काही मोजक्या प्रजातींमध्ये श्वानांचाही समावेश होत असल्याचे या संशोधकांनी सांगितले.

क्योटो विद्यापीठातील संशोधकांनी तीन गटांमध्ये एकूण १८ कुत्र्यांवर हा प्रयोग केला. या तिन्ही गटांमध्ये कुत्रा, त्याचा मालक आणि दोन अनोळखी व्यक्ती यांचा समावेश होता. या प्रयोगामध्ये कुत्र्याचा मालक एक डबा उघडण्यासाठी इतरांची मदत मागतो, असा प्रसंग तयार केला होता.

यात कुत्र्याच्या मालकाने डबा उघडण्यासाठी दोघांना मदतीची विनंती केली. त्यापैकी एकाने स्पष्टपणे नकार दिला. दुस-याने काहीही उत्तर दिले नाही.
‘कुत्री फक्त स्वत:चाच विचार करत असते, तर कोणत्याही गटामध्ये अनोळखी, ति-हाईत व्यक्तींकडून त्यांनी अन्न स्वीकारले असते. हे प्रमाण प्रत्येक प्रयोगामध्ये जवळपास सारखेच दिसले असते. सहकार्यावर आधारित सामाजिक संवादामधील हा एक महत्त्वाचा घटक आहे. मानवाशीही कुत्री अशा प्रकारे सहकार्य करू शकतात, हे या प्रयोगातून समोर आले,’ असे संशोधकांचे म्हणणे आहे. हा अहवाल जूनच्या अखेरीस प्रसिद्ध होणा-या ‘अ‍ॅनिमल बिहेव्हियर’ या नियतकालिकामध्येही प्रसिद्ध होणार आहे.

Leave a Comment