आणखी स्वस्त होणार गृह, वाहन कर्ज; अर्थमंत्री अरुण जेटली यांचे संकेत

emi
नवी दिल्ली : अलीकडेच आपल्या प्रमुख कर्जांवरील व्याजदरात भारतीय रिझर्व्ह बँकेने ०.२५ टक्क्यांनी कपात केली आहे. नजीकचा भविष्यकाळ यापेक्षाही चांगला राहणार आहे. कारण, आरबीआयकडून व्याजदरात आणखी कपात करण्यात येण्याची शक्यता असल्याने गृह आणि वाहन कर्ज यापेक्षाही स्वस्त होईल, असे सुतोवाच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे दिले.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांसोबत आणखी व्याजदर कपातीची शक्यता, प्रमंडळ कर्जाच्या थकबाकीचे वाढते प्रमाण आणि अर्थव्यवस्थेची स्थिती यासारख्या मुद्यांवर सविस्तर चर्चा केल्यानंतर अरुण जेटली यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, निधीअभावी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी स्वत: वित्तसेवा खात्याचे सचिव यापुढे लक्ष घालणार आहेत. नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक सुधारणांसाठी जी पावले उचलली आहेत, त्याचा सकारात्मक परिणाम आता लवकरच दिसून येणार आहे. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात सार्वजनिक बँकांकरिता सरकारने निधीची जी तरतूद केली होती, त्यापेक्षाही अधिक निधी मिळावा, अशी बँकांची मागणी आहे. या मागणीवरही सरकार गंभीरपणे विचार करीत आहे. मान्सूनचा पाऊस यावर्षी सरासरीपेक्षा कमी राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज असला, तरी संभाव्य दुष्काळ स्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने स्वत:ला सज्ज ठेवले आहे. त्यामुळे कमी पावसाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, ही भीती कुणीही मनात ठेवू नये, असे सांगताना आगामी काही महिन्यातच प्रमुख कर्जांवरील व्याजदरात आणखी कपात झालेली असेल, असे जेटली यांनी सांगितले.

Leave a Comment