विद्यापीठांच्या क्रमवारीत भारताची घसरण

times
नवी दिल्ली : नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आशियाई विद्यापीठांच्या क्रमवारीत भारताची घसरण झाली असून, देशातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यामुळे धक्का बसला आहे.

जपान, सिंगापूर, हॉंगकॉंग आणि चीन या देशांच्या विद्यापीठांनी टाईम्स हायर एज्युकेशन आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०१५ मध्ये वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भारतीय शिक्षण संस्थांपुरता विचार करायचा झाल्यास बंगळुरच्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सला या क्रमवारीत ३७ वे आणि पंजाब विद्यापीठाला ३८ वे स्थान देण्यात आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत पंजाब विद्यापीठाची सहा स्थानांनी घसरण झाली आहे, असे क्रमवारी संस्थेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या क्षेत्रात भारत करत असलेल्या प्रगतीला ब्रेक लागला असून, पहिल्या १०० अव्वल विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यापीठांची संख्या ९ आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा आकडा एकने कमी झाला आहे.

रूरकी, मुंबई, दिल्ली, खरगपूर आणि मद्रास येथील आयआयटी, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ या संस्थांचा आशियातील अव्वल १०० संस्थांमध्ये समावेश आहे. या क्रमवारीत टोकियो विद्यापीठाने आपले अव्वल स्थान कायम राखले असून, सिंगापूरची नॅटिप्नल युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ हॉंगकॉंग यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे. जपान, हॉंगकॉंग आणि दक्षिण कोरिया या देशांच्या प्रत्येकी तीन विद्यापीठांनी अव्वल २० मध्ये स्थान मिळविले आहे, तर चीन आणि तुर्कीच्या प्रत्येक दोन विद्यापीठांचा यामध्ये समावेश आहे. या क्रमवारीत भारताची झालेली घसरण ही अतिशय चिंतेची बाब असल्याचे टाईम्स हायर एज्युकेशन रँकिंगचे संपादक फिल बॅटी यांनी म्हटले आहे.

Leave a Comment