सकारात्मक धोरणांमुळेच उद्योजकांची महाराष्ट्राला पसंती – मुख्यमंत्री

cm
पुणे – परवान्यांसह इतर धोरणात राज्यशासनाने केलेल्या सकारात्मक बदलांमुळेच उद्योजकांची महाराष्ट्राला प्रथम पसंती मिळत आहे. यापुढेही राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न सुरुच राहतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

येथील चाकण एमआयडीसीतील मर्सिडीस बेंझ कंपनीच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारित उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामानबदल राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री गिरीष बापट, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार सुरेश गोरे, आमदार संजय भेगडे, मर्सिडीज बेंझ कंपनीचे मुख्यकार्यकारी अधिकारी केन्ट, पियुष आरोरा, रघुनंदन पेंडसे उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मर्सिडीज बेंझ ही कंपनी जगभरातील प्रथितयश कंपनी आहे. कंपनीने सुरु केलेल्या या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारित उत्पादन प्रकल्पामुळे येथील उत्पादन दुपटीने वाढणार असून दरमहा दहा हजार गाड्यांवरुन वीस हजार गाड्यांचे उत्पादन येथे होणार आहे. या प्रकल्पात उत्पादनाबरोबरच रोजगाराची संधीही दुप्पट होणार आहे. याचा फायदा या परिसरातील लोकांनाच होणार आहे. उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी राज्यशासनाने कौशल्य विकासाचा नवा प्रकल्प हाती घेतला आहे. मर्सिडीज बेंझ सारख्या प्रतिथ यश कंपनीने राज्य शासनाच्या या उपक्रमात सहभाग घेतल्यास त्यांनाही कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी बोलताना जावडेकर म्हणाले की, पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया अभियानाला गती देण्यासाठी उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या पर्यावरण विषयक परवानग्यांचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. ‘मेक इन इंडिया’ला अधिक गती मिळावी म्हणून प्रदूषण आणि पर्यावरणावर परिणाम न करणाऱ्या उद्योगांना आणि शैक्षणिक संस्थांना यापुढे पर्यावरण विषयक परवानग्या घेण्याची गरज राहणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.
सुभाष देसाई म्हणाले, महाराष्ट्राची जगभरात उद्योग फ्रेंडली अशी नवी ओळख निर्माण होत आहे. त्यामुळे जगभरातील उद्योजक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला प्राधान्य देत आहेत. राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment