भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचे संशोधन; पाण्यावर आधारित संगणकाची निर्मिती

computer
नवी दिल्ली : २५ वर्षांपूर्वी परम महासंगणक विकसित करून भारतीय शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी जगाला भारतीयांची प्रतिभा दाखवून दिली होती. आता पुन्हा भारतीय वंशाच्या युवकाने थेट पाण्यावर आधारित संगणकाची निर्मिती करून विज्ञान जगतात यशाची पताका फडकविली आहे.

स्टॅनफोर्ड विद्यापीठातील बायोइंजिनीअरिंगचे प्राध्यापक प्रकाश आणि त्यांच्या चमूने हा ड्रॉपलेट कॉम्युटर विकसित केला आहे. भौतिक शास्त्रातील तत्त्वांचा वापर करीत हलत्या पाण्याच्या थेंबांचा वापर करून हा संगणक तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जेव्हा एक दशकापूर्वी प्रकाश याच विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून महाविद्यालयात शिकत होते तेव्हाच त्यांच्या डोक्यात अशा प्रकारचा पाण्यावर आधारित संगणक तयार करण्याची कल्पना घोळत होती. आज त्यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. भौतिकशास्त्रातील तरल गतिकी या तत्त्वाचा आधार घेऊन ड्रॉपलेट फ्युड डायनॅमिक्सने या संगणकाचे परिचलन करण्यात येते. सार्वत्रिक प्रयत्न, तर्कशास्त्र आणि नियंत्रण यामुळेच हे कार्य साध्य झाल्याचे प्रकाश यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

आधुनिक इलेक्ट्रॉनिक संगणकाच्या तुलनेत या वॉटरबेस संगणकाचा वेग सध्या मंद आहे. मात्र, पाण्याचा एक लहानसा थेंबही हा संगणक सुरू करू शकतो तसेच पारंपरिक संगणकाप्रमाणेच गणित किंवा अन्य ऑपरेशनल वर्क करू शकतो, असे प्रकाश यांनी सांगितले. प्रक्रियेची माहिती मिळविण्यासाठी डिजिटल संगणक आधीपासूनच कार्यरत आहेत. आमचे ध्वेय इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर किंवा त्याचे परिचालन करणा-यांशी स्पर्धा करण्याचे नाही, असे प्रकाश यांनी स्पष्ट केले. संगणकावर आधारित कामे अधिकाधिक सुलभ, अचूक आणि परिपूर्ण व्हावीत यासाठीच आम्ही या ड्रॉपलेट संगणकाची निर्मिती केली आहे, असेही त्यांनी नमूद केले. संगणकाशी संबंधित फिजिकल (शारीरिक) गोष्टी व्यवस्थित हाताळणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे हेच आमचे लक्ष्य आहे, असेही प्रकाश यांनी सांगितले.

Leave a Comment