मुलीच्या जन्मानंतर ११ रोपे मिळणार- शासनाची योजना

saplings
मुंबई – राज्यात मुलीचा जन्म झाल्यानंतर आंबा, फणस, जांभूळ, साग अशा विविध ११ प्रकारच्या झाडांची रोपे मुलीच्या जन्मदात्यांना दिली जाणार आहेत. ही रोपे शेतांच्या बांधावर लावायची असून या झाडांपासून जे उत्पन्न मिळेल त्यातून मुलीच्या शिक्षणाचा खर्च केला जावा अशी ही योजना आहे. शिवाय मुलगी मोठी झाल्यानंतर ही झाडे कापण्याचा अधिकारही संबंधित कुटुंबाला दिला जाणार आहे.राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाच्या या योजनेची माहिती दिली आहे.

मुनगंटीवार म्हणाले या योजनेमुळे मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे हा उद्देश आहे त्याचबरोबर वनक्षेत्रात वाढ व्हावी हाही उद्देश आहे. सध्या राज्याचे वनक्षेत्र २० टक्के आहे ते ३३ वर नेण्याचा प्रयत्न आहे. ही योजना सध्या पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यात राबविली जाणार असून त्यात पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला यांचा समावेश आहे. या योजनेसाठी एक सॉफ्टवेअरही तयार केले गेले आहे. त्याच्या मदतीने जन्माला येणार्याह मुलींची संख्या व वाटप करावयाच्या रोपांची संख्या यांचा ताळमेळ घातला जाणार आहे. पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर राज्याच्या अन्य भागातही ही योजना राबविली जाणार आहे.

Leave a Comment