रेल्वेच्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना विमानाचा पर्याय

irctc

आयआरसीटीसी’चा अभिनव उपक्रम

नवी दिल्ली: रेल्वे आरक्षणाच्या प्रतीक्षा यादीत असलेल्या ज्या प्रवाशांना आरक्षण मिळणार नाही; त्यांना आपल्या रेल्वे तिकीटा ऐवजी विमानाचे तिकीट उपलब्ध होऊ शकणार आहे. ते ही स्पर्धात्मक दरात!

‘आयआरसीटीसी’ने किफायतशीर दरात विमान प्रवास सेवा देणा-या कंपन्यांशी करार करून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेच्या प्रथम वर्ग आणि स्लीपर कोचच्या प्रवाशांचे आरक्षण जर प्रतीक्षा यादीत असेल तर त्यांना प्रवासापूर्वी ३ दिवस आपले रेल्वेचे तिकीट विमानाच्या तिकिटात रुपांतरीत करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आपला प्रवास रद्द करावा लागणार नाही आणि विमान प्रवासाची सुविधा सुमारे ३० ते ४० टक्के कमी दरात उपलब्ध होणार आहे. प्रवाशांना रेल्वेच्या तिकीटाची मागणी ज्या दिवसाच्या प्रवासासाठी आहे; त्या किंवा त्याच्या दुस-या दिवशीची विमानाची तिकिटे उपलब्ध होऊ शकतील.

यासाठी ‘आयआरसीटीसी’ने गो एअर या हवाई प्रवासी कंपनीबरोबर करार केला असून एक महिन्याच्या कालावधीत अशी १०० हवाई तिकिटांची विक्री केली आहे. लवकरच स्पाईस जेट या कंपनीबरोबरही करार करण्यात येणार असल्याचे ‘आयआरसीटीसी’चे प्रवक्ता संदीप दत्ता यांनी सांगितले.

देशांतर्गत हवाई वाहतूक करणा-या कंपन्यांच्या विमानांमध्ये प्रत्येक फेरीत सुमारे २५ टक्के जागा रिकाम्या असतात. त्यामुळे प्रवाशांना किफायतशीर पर्याय उपलब्ध होण्याबरोबरच विमान कंपन्यांनाही रेल्वेच्या या उपक्रमांमुळे प्रवासी उपलब्ध होणार आहेत.

Leave a Comment