आयव्हीएफ पद्धतीने ६० वर्षीय वृद्धेने दिला गोंडस बालकाला जन्म

ivf
अहमदाबाद – गुजरातमध्ये एका ६० वर्षीय वृद्ध महिलेने गोंडस बालकाला जन्म दिला आहे. विश्वास बसत नाही ना… पण हे खरे आहे. साधारणपणे वयाच्या ४६ वर्षानंतर महिलांमध्ये आई बनण्याची क्षमता संपुष्टात येते. परंतु अहमदाबादमधील एका रुग्णालयात मुंबईच्या रहिवासी असलेल्या महिलेने वयाच्या साठीत गोंडस बालकाला जन्म दिला आहे. बालकाचे वजन 3.90 किलोग्रॅम असून तो सुदृढ आहे.

‘इन व्हिंट्रो फर्टिलायझेशन’ (आयव्हीएफ) पद्धतीने मुंबईच्या रहिवासी पूंजीबेन यांनी गोंडस बालकाला जन्म दिला आहे. साठीच्या वयात खूप कमी महिलांना आयव्हीएफ पद्धतीने मातृत्त्व मिळते. ३५ वर्षांपूर्वी पूंजीबेन यांचा विवाह रणछोडभाई यांच्याशी झाला. विवाहाला अनेक वर्षे झाले तरी रणछोडभाईंच्या घरी पाळणा हालला नाही. १० वर्षांपासून हे दाम्पत्य मुंबईत स्थायिक झाले आहे.
तब्बल १५ वर्षे रजोनिवृत्तीमध्ये राहिल्यानंतरही पूंजीबेन शांत बसल्या नाहीत. पुंजीबेन यांनी अहमदाबाद येथील एका फर्टिलिटी सेंटरशी संपर्क साधला. पुंजीबेन आयव्हीएफच्या मदतीने आई बनू शकतात, असे फर्टिलिटी सेंटरच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितले. पूजींबेन आयव्हीएफसाठी तयार झाल्या.

अहमदाबादचे डॉ. मेहुल दामाणी यांनी सांगितले की, पूंजीबेन यांचे गर्भाशय आकुंचित झाल्यामुळे त्या वृद्धावस्थेत आई बनण्याची शक्यता तशी कमीच होती. तरी देखील पुंजीबेन यांनी आशा सोडली नाही. हॉर्मोनचा डोस देऊन पुंजीबेन यांचे गर्भाशय पुन्हा सक्रिय करण्‍यात आले. नंतर त्यांची मासिक पाळी सुरु झाली. आयव्हीएफ ट्रायलदरम्यान पती रणछोडभाईंचे शुक्राणु पुंजीबेन यांच्या गर्भाशयात सोडून गर्भ तयार करण्यात आला.

Leave a Comment