दीड लाख भाविकांची अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी

amarnath
श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या हिमालय पर्वतांमधील वार्षिक पवित्र अमरनाथ यात्रेला पुढील महिन्यात प्रारंभ होत असून देशभरातील एकूण दीड लाख भाविकांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे.

या वार्षिक यात्रेसाठी आतापर्यंत दीड लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. येत्या २ जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होणार असून, ती १९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. सुमारे दोन महिने चालणारी यात्रा सुरळीतपणे पार पडावी यासाठी काश्मीरचे विभागीय आयुक्त असगम सामून यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. नागरी, लष्करी, निमलष्करी दल आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी या बैठकीला उपस्थित होते, असे प्रवक्त्याने याबाबत माहिती देताना सांगितले.

प्रत्येक दिवशी साडेसात हजार भाविकांना यात्रेसाठी जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. अनंतनाग जिल्ह्यातून जाणारा ४५ किमी लांबीचा पारंपरिक पहलगाम मार्ग आणि गंदरबाल जिल्ह्यातून जाणारा १६ किमी लांबीचा बालटाल मार्ग या दोन्ही मार्गांवर भाविकांसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती या बैठकीत देण्यात आली, असेही प्रवक्त्याने सांगितले. आरोग्य विभागाने यात्रा मार्गात २५ ठिकाणी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था केली आहे.

Leave a Comment