आजपासून १५ दिवस मंगळयान ‘नॉट रिचेबल’

isro
बंगळुरू – आजपासून १५ दिवस भारतीय अवकाश संस्था ‘इस्रो’ने मंगळाच्या अभ्यासासाठी पाठवलेले ‘मंगळयान’ संपर्क कक्षेच्या बाहेर जाणार असून पृथ्वी आणि मंगळाच्या मध्ये सूर्य येणार असल्याने भारताचा नियंत्रण कक्ष या यानाशी संपर्क साधू शकणार नसून, या कालावधीत हे यान स्वत:चे निर्णय स्वत:च घेणार असल्याची माहिती ‘इस्रो’च्या अधिका-यांनी दिली आहे.

८ जून ते २२ जून या कालावधीत हा संपर्क तुटणार असून या प्रकाराला वैज्ञानिक भाषेत ‘ब्लॅक आऊट’ असे संबोधले जाते. ‘याआधीही ठरावीक कालावधीसाठी यान संपर्काबाहेर जाण्याच्या घटना घडल्या आहेत, मात्र इतक्या मोठय़ा कालावधीत यानाशी संपर्क न होण्याची ही पहिलीच घटना असून हा कालावधी संपल्यावर आम्हाला उपग्रहाद्वारे यानाशी पुन्हा यशस्वीरित्या संपर्क साधता येईल’, असा विश्वास ‘इस्रो’ने व्यक्त केला आहे.

मंगळयानात अशाप्रकारे काही दिवस संपर्काशिवाय राहण्यासाठी विशेष सुविधा आहे. १५ दिवसांसाठी संपर्काबाहेर जाण्यापूर्वी यानाशी दिवसातून काही तास संपर्क साधत असल्याचेही ‘इस्रो’ने स्पष्ट केले. अतिरिक्त इंधन पुरवठा उपलब्ध असल्याने मार्च महिन्यात या यानाचा प्रवास ६ महिन्यांसाठी वाढवण्यात आला होता. हा प्रवास आणखी वाढवला गेल्यास २०१६ सालच्या मे महिन्यात पुन्हा हे यान संपर्क कक्षेच्या बाहेर जाण्याची परिस्थिती उद्भवणार असून त्यावेळी सूर्य आणि मंगळाच्या मध्ये पृथ्वी येणार आहे.

Leave a Comment