हमालाचा मुलगा २५ व्या वर्षीच झाला न्यायाधीश

sachin
नाशिक : लासलगावतील हमाली करणा-या एका बापाच्या कष्टाचे चीज झाले असून मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मात करत सचिन न्याहारकर हा हमालाचा मुलगा आता न्यायाधीश झाला आहे.

सचिन उत्तमराव न्याहारकर याने न्यायाधीश परीक्षेत ओबीसी गटातून राज्यात दुसरा येण्याचा मान पटकावला असून त्याने मिळविलेल्या या यशामुळे सचिनवर गावकरी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सचिनने दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच घेऊन बारावीपर्यंतचे शिक्षण लासलगाव येथे घेतले. बारावीत चांगले मार्क मिळाल्याने सचिनने पुण्यातील लॉ कॉलेजला प्रवेश घेतला. घरातील परिस्थिती नाजूक, आई-वडिलांनी पोटाला चिमटा काढत मुलांच्या शिक्षणात कुठलीच कसूर ठेवली नाही. नातेवाईकांच्या मदतीने पुण्यात पोहोचला आणि तेथे शिकत असतानाच त्याने न्यायाधीशाची परीक्षा दिली. या परीक्षेसाठी राज्यभरातून ४७ हजार विद्यार्थी बसले होते, त्यापैकी दोन हजार ४०० विद्यार्थी पास झाले तर ३७८ जणांना निमंत्रित करण्यात आले. अत्यंत जिद्दीने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची न्यायाधीशांची परीक्षा दिली. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, सचिनने राज्यात दहावा आणि इतर मागासवर्गीय गटातून (ओबीसी) दुसरा क्रमांक मिळवला आहे.

Leave a Comment