सौरऊर्जेवर धावणार नागपूरची मेट्रो !

nagpur-metro
नागपूर : भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या नागपुरमध्ये येथील मेट्रो प्रकल्पात सौरऊर्जा निर्मिती करण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय घेण्यात आला असून या प्रकल्पाला लागणा-या विजेपैकी ४० टक्के वीज निर्मिती करता येईल, असा विश्वास प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला आहे.

नागपूर मेट्रो प्रकल्पातील अधिकारी नुकतेच जर्मनीचा दौरा आटोपून आले आहेत. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी दीक्षित यांनी मेट्रोमध्ये सौरऊर्जा निर्मितीसाठी जर्मनीने संपूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केल्याची माहिती दिली. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प ऑटोमोटीव चौक ते मिहान आणि प्रजापती नगर, वर्धमाननगर ते हिंगणा अशा दोन मार्गांवर साकारण्यात येणार आहे. यातील पहिल्या मार्गावर १७ आणि दुस-या मार्गावर १९ स्टेशन असतील. या स्टेशनवर, मेट्रोच्या प्रकल्पाच्या जागेत सोलर पॅनल उभारण्यात येतील. त्यातून नागपूर मेट्रो ३० मेगावॅट सौरऊर्जेची निर्मिती करू शकते, असेही दीक्षित यांनी सांगितले.

शहर बस वाहतुकीसोबत मेट्रो रेल्वेला पूरक होईल, अशी फिडर बस सुविधा साकारण्यात येणार आहे. याशिवाय सायकल आणि बॅटरीवर चालणारी रिक्षा आदि सुविधांही देण्यात येणार आहेत. त्यामुळे नागपुरातील नागरिकांना धूळ आणि प्रदूषणमुक्त प्रवास करता येईल.

Leave a Comment