देशभरात ११०० बेटे आणि ३०० दीपगृहे उभारली जाणार

island
जलवाहतुकीचा वापर वाढविण्याबरोबरच देशातील पर्यटन क्षेत्राची प्रचंड क्षमता उपयोगात आणण्यासाठी देशभरात ११०० कृत्रिम बेटे आणि ३०० दीपगृहे उभारण्याची योजना आखली जात असल्याचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. फिक्कीने आयोजित केलेल्या आयलंड वॉटरवेज विषयावरील राष्ट्रीय परिषदेत गडकरी बोलत होते.

गडकरी म्हणाले की देशातील १०१ नद्यातून जलमार्ग सुरू करण्याच्या योजनेला संसदेची मंजुरी घेतली जात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ११०० बेटे आणि ३०० दीपगृहे उभारणीच्या प्रकल्पाचाही या प्रस्तावात समावेश करण्याविषयी सांगितले आहे. यामुळे जल, रस्ता तसेच हायवेसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. जलवाहतुकीसाठी येत्या २-३ वर्षात ५० हजार कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत.

पंतप्रधानांच्या नियोजित बांग्ला देश भेटीत दोन्ही देशात जलवाहतुकीमार्गे मालवाहतूक करण्यासंदर्भातील करार अपेक्षित आहे असे सांगून गडकरी म्हणाले की ११०० बेटे आणि ३०० दीपगृहे उभारणीचा प्रकल्प खासगी व सरकारी भागीदारीतून राबविला जाणार आहे. नदीक्षेत्रात पर्यटन वाढीसाठी त्याचा मोठा उपयोग होणार आहे. रस्ते योजनेतील पाच प्रकल्पांसाठी खासगी कंपन्यांनी गुंतवणूक करण्यास उत्साह दाखविला असून एल अॅन्ड टीचाही यात सहभाग आहे.

Leave a Comment