सतत ६० तास भाषण देत भारतीयाने मोडला अमेरिकेचा विश्वविक्रम !

world-record
मुंबई – विश्वविक्रम हे मोडण्यासाठीच बनत असतात. मात्र काही रेकॉर्ड कायमस्वरुपी ठेवण्यासाठी त्या व्यक्तीला पहिल्यांदा रचलेला रेकॉर्ड मोडण्याचे साहस करावे लागते. छत्तीसगढमधील कोरबा जिल्ह्यातील प्रसिद्ध वक्ते डॉ. अजय शेष यांनी मुंबईत अगदी असाच विक्रम केला आहे.

कोणत्याही सामान्य व्यक्तीला अधिक बोलण्याने थकवा येतो किंवा त्याचा गळा सुकतो. मात्र डॉ. अजय शेष यांनी सतत ६० तास ३० मिनिटे न थकता, न झोपता भाषण देत अमेरिकेतील झॅक झेहॅन्डर यांचे ५३ तास १८ मिनिटांचे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मोडले आहे. एवढेच नाही तर शेष यांनी स्वत:चा ४९ तास ३९ मिनिटांचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड मोडत स्वत:चा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

मुंबईतील फोर सिझन्स हॉटेलमध्ये पार पडलेल्या या विश्वविक्रम कार्यक्रमाचे आयोजन मुंबईच्या कृती प्रमोशन्स संस्थेने केले होते. २७ मे २०१५ रोजी दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांनी बोलण्यासाठी उभे राहिलेले डॉ.शेष यांनी २९ मे च्या रात्री ९ वाजता अमेरिकेच्या झॅक झेहन्डरचे ५३ तास १८ मिनिटांचे रेकॉर्ड मोडले. मात्र तेवढ्यावरच न थांबता शेष यांनी ६० तासांचे लक्ष्य समोर ठेवत ३० मे रोजी सकाळी ४ वाजून १३ मिनिटांनी नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला.

या विक्रमासाठी आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वर्षभर दिवसाचे १२-१२ तास सराव केला असून मेडिटेशन आणि योगाद्वारे झोप आणि थकव्यावर नियंत्रण ठेवले असल्याचे ४४ वर्षांच्या डॉ. शेष यांनी सांगितले. डॉ. शेष हे उच्चविद्याविभूषित असून व्यवसायाने ते पॅथॉलॉजिस्ट आहेत. याशिवाय त्यांनी एमबीए, एम.फिल मॅनेजमेंटच्या पदवी प्राप्त केल्या आहेत. सध्या ते मॅनेजमेंटच्या विषयात पीएचडी करत आहेत.

Leave a Comment