जुन्या नोटा बदलाची मुदत ३० जूनला संपणार

currancy
मुंबई – रिझर्व्ह बँकेने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी तसेच बनावट चलनी नोटांवर नियंत्रण आणण्यासाठी २००५ पूर्वीच्या चलनी नोटा बदलून घेण्याची दिलेली मुदत येत्या ३० जूनला संपते आहे. त्यानंतर नोटा बदलायच्या असतील तर ग्राहकाला त्याचे खाते असलेल्या बॅकेतच त्या द्याव्या लागतील तसेच बदलताना ओळखपत्र अथवा निवासी पुरावाही द्यावा लागेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

जुन्या म्हणजे २००५ पूर्वी छापण्यात आलेल्या नोटावर छपाईचे वर्ष छापले गेलेले नाही. त्यामुळे या नोटा ओळखणे सोपे आहे. २०१४ ला या नोटा नष्ट करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला होता व त्यासाठी सुरवातीला बदलून घेण्याची मुदत ३१ मार्च १४ ठरविली गेली होती नंतर ती वाढवून १ जानेवारी १५ करण्यात आली होती. या काळात कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेत या नोटा बदलून घेता येत होत्या.

जानेवारी १४ ते मार्च २०१५ या काळात रिझर्व्ह बँकेकडे २१,७५० कोटी रूपये किमतीच्या १६४ कोटी जुन्या नोटा जमा झाल्या असल्याचेही समजते. या नोटा रिझर्व्ह बँक नष्ट करणार आहे.

Leave a Comment