आयर्लंडमधला समलैंगिक बैल बेंजी

bengy
आजकाल समलैगिक माणसांबद्दल बरीच चर्चा जगभरात होते आहे. त्यांना लग्न करण्याचा हक्क देणारे कायदे अनेक देशात पास केले जाताहेत. मात्र आजपर्यंत प्राणीही समलैंगिक असल्याचे एकीवात नव्हते. आयर्लंडमध्ये बेंजी नावाचा एक समलैंगिक बैल असल्याची बातमी त्यामुळेच चवीने वाचली जात असावी.

बेंजीला म्हणे गाईंपेक्षा बैलांबरोबर राहणेच अधिक आवडते. त्याच्या पहिल्या मालकाला जेव्हा बेंजीच्या या गुणाचा पत्ता लागला तेव्हा त्याने बेंजीला नोव्हेंबर २०१४ मध्ये कसायाला विकले. कसायाने त्याची कत्तल करण्याअगोदरच प्राणी संरक्षणासाठी मोठे काम करणार्‍या सॅम सिमोनने बेंजीला कसायाकडून खरेदी केले. सिमोनच्या मते बेंजी गाईंपेक्षा बैलांबरोबर अधिक आनंदी असतो हे कारण त्याला कसायाला विकण्यासाठी अगदीच योग्य नव्हते. पण दुर्देवाने सिमोनचेही मार्चमध्ये कर्करोगाने निधन झाले त्यामुळे आता बेंजी पशु अभयारण्यात आहे. विशेष म्हणजे सिमोनने कसायाच्या तावडीतून असे प्राणी सोडविण्यासाठी आपल्या आयुष्याची पुंजी १०० दशलक्ष डॉलर्स खर्च केले आहेत.

पशु अभयारण्याच्या प्रमुख वेंडी वेलेंटाईन यांच्या म्हणण्यानुसार बेंजी गे नाही. आता तो गाईंपेक्षा बैलांत अधिक रमतो हे खरे आहे. पण तो चांगलाच धष्टपुष्ट आणि आरोग्यपूर्ण आहे. त्याचे हृदय थोड कमजोर असल्याचेही वेंडीचे म्हणणे आहे.