आता ‘गुगल फोटो’ची सेवा उपलब्ध

google
सॅन फ्रान्सिस्को : सोशल नेटवर्किंग माध्यमातून आपले फोटो, व्हीडीओ शेअर करण्याचा ट्रेंड आहे. त्यातही सेल्फी काढण्याची हौसही मोठी असते. मात्र इतक्या संख्येने काढले जाणारे, शेअर केले जाणारे फोटो साठविण्याचा आणि ते लगेचच शेअर करण्यासाठी उपलब्ध होण्याचा प्रश्न असतो. हीच अडचण आता गुगलने दूर केली आहे. मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत फोटो, व्हीडीओ शेअर करणे गुगलने सोपे केले आहे. या सर्व गोष्टी तुम्ही आता ‘गुगल फोटो’ या सेवेद्वारे तुमच्या जी-मेल अकाऊंटशी लिंक असलेल्या क्लाऊडवर साठवून ठेवू शकता. त्यामुळे कोणत्याही गॅझेटवरून एका छोट्या लिंकद्वारे ते इतरांसोबत शेअर करता येईल.

गुगल फोटो या सुविधेमध्ये १६ मेगापिक्सलपर्यंतचे फोटो आणि १०८०पी अर्थात फुल एचडी क्षमतेचे व्हीडीओ साठवून ठेवता येतील. यापेक्षा अधिक क्षमतेचे व्हीडीओ-फोटो असतील तर त्याचे रिझोल्युशन कमी करून गुगल सेव्ह करून ठेवेल. हे सर्व क्लाऊडवर सेव्ह होणार असल्याने तुमचा मोबाईल, कॉम्प्युटरमधील मेमरी वापरली जाणार नाही. या अंतर्गत अमर्याद फोटो-व्हीडीओ साठवून ठेवू शकाल. मात्र तुम्हाला १६ मेगापिक्सल किंवा १०८० पी पेक्षा अधिक दर्जेदार व्हीडीओ-फोटो साठवून ठेवायचा असेल तर मात्र गुगलच्या जुन्या सेवेमधील १५ जीबीची जागा वापरता येईल. मात्र त्यासाठी त्यासाठी तुम्हाला ‘ओरिजिनल’ किंवा ‘हायक्कालिटी’ प्लॅन यामधून निवड करावी लागेल.

तुमच्या फोटोचा प्रकार, त्यातील व्यक्ती-ठिकाणे यांचा विचार करून गुगल फोटो त्यांचे स्वतःहून वर्गीकरण
करणार आहे. त्यामुळे तुमच्या घराचे फोटो, मुलांचे फोटो, तुमच्या पाळीव प्राण्यांचे फोटो, असे वर्गीकरण तुम्ही करण्याची गरज राहणार नाही. हे फोटो सर्च करणेही सोपे असून फोटोतील तुमच्या लक्षात असलेली गोष्ट सांगून तुम्ही सर्च केले की लगेच तशा प्रकारचे फोटो तुमच्यासमोर हजर होतील. यामध्ये फोटो एडिटिंगचीही सुविधा देण्यात आली असून त्यात फोटोचे बेसिक एडिटिंग करता येते. फोटो नेमका कसा आणि कुठे एडिट करायचे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर त्यात ‘ऑटो फिक्स’ चा पर्याय देण्यात आला असून याद्वारे तुमचा फोटो गुगलच एडिट करून अधिक चांगला कसा दिसेल याचा प्रयत्न करते. यामध्ये कोलाज, पॅनोरमा, अ‍ॅनिमेटेड फाईल तयार करण्याचाही पर्याय आहे. गुगल फोटोमध्ये सेव्ह केलेले व्हीडीओ-फोटो तुम्ही ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक वगैरे कुठल्याही ठिकाणी शेअर करू शकाल. त्यासाठी आवश्यक लिंक तयार करण्याचा पर्याय यात देण्यात आला आहे. त्यामुळे गुगल फोटो नसलेल्या व्यक्तीही या ठिकाणी सेव्ह केलेले फोटो पाहू शकतील किंवा डाऊनलोड करू शकतील.

Leave a Comment