
संशोधकांनी माणसाप्रमाणेच कोणतेही काम शिकू शकणारे आणि काम पूर्ण करणारे रोबो तंत्रज्ञान विकसित केले असून यामुळे एकच रोबो अनेक प्रकारची कामे करू शकणार आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी हे तंत्रज्ञान विकसित केले असून यात रोबो नवीन बनविलेला नाही तर त्याचे प्रोग्रॅमिंग जादा स्मार्ट केले आहे. विलो गॅरेज पीआर २ असे या रोबोचे नामकरण केले गेले आहे.
कोणतेही काम शिकून पूर्ण करणारे रोबो
या रोबोसाठी जे स्मार्ट प्रोग्रॅमिंग तयार केले आहे त्याला डीप लर्निंग असे नांव दिले गेले असून या तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले रोबो इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन रोबोटिक्स अॅन्ड अॅटोमेशनमध्ये सादर केले जाणार आहेत. हे रोबो चुकतमाकतच कामे शिकतील आणि एकदा शिकल्यानंतर ती पूर्णही करतील. समोर ठेवलेल्या वस्तू कशा चालतात हे पाहूनही ते शिकू शकतील. सध्या काम शिकण्याचा या रोबोचा वेग अगदीच कमी आहे. म्हणजे बाटलीचे बूच उघडणे शिकण्यासाठीही त्याला बराच वेळ लागतो त्यामुळे सध्या घरकामासाठी हे रोबो फारसे उपयुक्त नाहीत. मात्र संशोधक रोबोची लर्निग प्रोसेस अधिक वेगवान व्हावी यासाठीही प्रयत्नशील आहेत आणि येत्या १० वर्षात ते वेगाने कामे शिकणे व करणे यासाठी वापरता येतील असे संशोधक पीटर एब्बेल यांचे म्हणणे आहे.
