रेल्वे स्टेशनवर मिळणार एअरपोर्टसारख्या सुविधा !

prabhu
नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालय रेल्वे स्टेशनवर अत्याधुनिक सुविधा देण्यास प्राधान्य देणार आहे. विशेषतः विमानतळावर जशा सुविधा दिल्या जातात, त्याच तोडीच्या सुविधा रेल्वे स्टेशनवर दिल्या जातील. याशिवाय रेल्वेच्या सुरक्षेबरोबरच स्वच्छता, विविध सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच रेल्वेची क्षमता अधिकाधिक वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.

बुलेट ट्रेन सुरू करण्यास काही वेळ लागेल. परंतु सध्या ज्या रेल्वे सुरू आहेत. त्याच्या फे-या वाढवून सुविधा उपलब्ध करून देण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न राहील, असेही प्रभू यांनी यावेळी सांगितले. एका खाजगी वृत्तवाहिनीच्या मंथन कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या समवेत माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव हेही उपस्थित होते. रेल्वे मंत्रालय नवे धोरण तयार करीत असून, या धोरणानुसार रेल्वे स्टेशन विकसित केले जाणार आहे. यासाठी निविदा जारी करून त्याची बोली लावण्यात येईल. यातून रेल्वे स्टेशनवर एअरपोर्टच्या सुविधा देण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न आहे. चालू बजेटमध्ये नवीन रेल्वे का घोषित केल्या नाहीत, असे विचारले असता अगोदरच रेल्वे ट्रॅकवर अधिक बोजा आहे. उत्तर प्रदेश-बिहारमधील रेल्वे मार्गावर तर क्षमतेच्या दुप्पट रेल्वे धावतात. त्यामुळे नव्या रेल्वे घोषित करण्यात आल्या नाहीत. विशेष म्हणजे आमचे लक्ष्य पायाभूत सुविधा आहे. त्यामुळे अधिकाधिक रेल्वेची घोषणा करण्याऐवजी आहे त्या चालविण्यावर लक्ष दिले जाणार आहे, असेही ते म्हणाले. बुलेट ट्रेन सुरू करणे वाटते तितके सोपे नाही. चीन आणि जपाननेदेखील व्यापक अभ्यास करून बुलेट ट्रेन सुरू केली. त्यासाठी स्वतंत्र इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक आहे. त्यामुळे सध्या रेल्वेच्या फे-या वाढविण्यावरच भर दिला जाणार आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Comment