येताहेत संवाद साधणारी स्मार्ट घरे

dmarthomes
संगणकाची बहुतेक कामे करणारे स्मार्टफोन जगात सगळीकडेच रूजले असतानाच आता अनेक कामे नुसत्या कमांडवर करणारी स्मार्ट घरे ग्राहकांसाठी तयार होत असून भारतातले असे पहिले घर म्हणजे सॅपल फ्लॅट तयार झाला आहे. दिल्लीजवळ गुरगांव येथे रहेजा डेव्हलपर्स कडून अयाना नावाचा हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्यासाठी बूर्ज खलिफाचे बांधकाम करणारी कंपनी अरबटेक यांचे सहाय्य घेण्यात आले आहे.

या विषयी मिळालेल्या माहितीनुसार ही घरे तुम्ही घरात असलात किंवा नसलात तरी तुम्ही कमांड द्याल त्याप्रमाणे कामे करणार आहेत. पडदे ओढून घेणे,एसी कंट्रोल, स्वयंपाकघरातील उपकरणे सुरू- बंद करणे अशी अनेक कामे करण्याबरोबरच ही घरे भविष्यात किराणा दुकानातून साहित्य मागविणे, भाजी खरेदी अशीही कामे करू शकणार आहेत. ही घरे तुमचा आवाज ओळखतील व नंतरच कमांडप्रमाणे काम करतील. सध्या फक्त इंग्रजी भाषाच वापरता येणार असली तरी भविष्यात विविध भाषा ती समजू शकतील आणि वेगवेगळी उच्चारपद्धतीही समजू शकतील आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरेही देतील असे रहेजा डेव्हलपर्सचे नयन रहेजा यांनी सांगितले.

रहेजा म्हणाले की कल्पना क्रांतीकारी आहे. या घरांना ऑपरेट करण्यासाठी स्मार्टफोनची आवश्यकता नाही. बांधकाम करतानाच आवश्यक सॉफटवेअर, हार्डवेअर, सेन्सर्स, मायक्रोचीप्स बसविल्या जाणार आहेत. तसेच बांधकामातच मायक्रोफोन्स, स्पीकर्सही इनबिल्ड स्वरूपातच दिले जाणार आहेत. १८०० ते ५५०० चौरस फूट घरांसाठी १ कोटी ते साडेपाच कोटी रूपये किंमत आहे आणि ऑटोमेशनसाठी किमतीच्या ५ ते ७ टक्के रक्कम खर्च करावी लागणार आहे. नजीकच्या काळात या घरांना ई कामॅर्स फ्रेंडली बनविले जाईल ज्यामुळे ही घरे तुमच्या गरजेनुसार वाणसामान अथवा भाजीपाला सिस्टीम सर्च करून जेथे स्वस्त आणि चांगला मिळेल तेथून घरपोच मागवू शकतील.

Leave a Comment