महाराष्ट्रातील किनारपट्टीवर आढळले ‘ब्लू व्हेल’

blue
सिंधुदुर्ग : दोन भलेमोठे ‘ब्लू व्हेल’ महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या किनारपट्टी समुद्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्राचे वनसंवर्धन आणि पाणथळ विभागाचे मुख्य अधिकारी एन वासुदेवन यांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी १९१४ साली महाराष्ट्राच्या समुद्रात अशाप्रकारचे ‘ब्लू व्हेल’ आढळून आले होते. त्यानंतर तब्बल गेल्या १०० वर्षांत ब्लू व्हेलचे दर्शन झाले नव्हते.

भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रमाच्या वतीने डॉल्फीन्सवरील अभ्यासासाठी नियोजित पथक महाराष्ट्राच्या समुद्रात शोध घेत असताना हे ब्लू व्हेल्स प्रजातीचे दोन मासे आढळून आले. तसेच २८ मार्च रोजी देखील या पथकाला कुणकेश्वरजवळ समुद्रात २.७ किमी अंतरावर ‘ब्लू व्हेल्स’ आढळून आले होते. त्यानंतर ११, १६,३० एप्रिल आणि ६ मे या चार दिवशी आचरा, तारकर्ली, तळाशील आणि सराजकोट येथेही हे दोन ‘ब्लू व्हेल्स’ दिसून आले. गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्राच्या समुद्रात डॉल्फीन्सचे सर्व्हेक्षण करत असलेल्या पाच सदस्यीय पथकाने विजयदुर्ग ते रेडीपर्यंतच्या किनारपट्टीवर सर्व्हेक्षण केले आहे.

Leave a Comment