देशात कॅन्सरचे रोज १३०० बळी

cancer
नवी दिल्ली : दिवसेंदिवस देशात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढतच असून, दररोज सरासरी १,३०० हून अधिक नागरिकांचा कॅन्सरने बळी जात आहे. ही धक्कादायक बाब इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या सर्वेक्षणात समोर आली आहे.

धावपळ आणि बदलती जीवनशैली यामुळे कॅन्सरसारखे आजार उद्भवतात, असे एका पाहणीतून समोर आले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (खउचठ)ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, सन २०१२ ते २०१४ या कालावधीत कॅन्सरने बळी गेलेल्या नागरिकांच्या संख्येत ६ टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
सन २०१४ मध्ये देशात कॅन्सरमुळे सुमारे ५ लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या वर्षांत २८ लाख २० हजार १७९ नागरिकांना कॅन्सर झाला होता. त्यातील ४ लाख ९१ हजार ५९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सन २०१२ मध्ये कॅन्सरच्या ३० लाख १६ हजार ६२८ रुग्णांची नोंद झाली होती. त्यातील ४ लाख ६५ हजार १६९ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिका-याने दिली.

प्रत्येक तंबाखूजन्य पदार्थांवर आरोग्यास हानीकारक असल्याची सूचना छापली जाते. मात्र लोक तंबाखू, जर्दा, विडी, सिगारेट, गुटखा सातत्याने खात आहेत. अशा व्यसनामुळे कॅन्सरने मरणा-यांच्या संख्येत ही वाढ झाली आहे. याच सर्वे दरम्यान भारतीय शास्त्रज्ञांनी कॅन्सर प्रतिबंधक वनस्तीचा शोध लावल्याचा दावा केला आहे. या शास्त्रज्ञांच्या टीमला पश्चिमी घाटात एक दुर्मिळ प्रजातीची वनस्पती आढळून आली आहे. या औषधी वनस्तपीमुळे कॅन्सरवर रामबाण उपाय होण्याची शक्यता आहे. या वनस्पतीचे नाव मिक्वेलिए डेंटते बड्ड असे आहे. ती एक वेल असून ती कॅन्सरविरोधी एल्केलॉइड कॅपटोथेसिन निर्माण करते. ही औषधी वनस्पती कर्नाटकाच्या कोदागुमध्ये मेदिकेरी जंगलात कुठे कुठे सापडते. बंगळूरच्या अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकोलॉजी अ‍ॅण्ड एन्वायरमेंट तसेच बंगळूर आणि धारवाडच्या युनिव्र्हसिटी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल सायन्सेसच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने या दुर्मिळ औषधी वनस्पतीचा शोध लावला आहे. आता ते या वनस्पतीची व्यावसायिकदृष्ट्या शेती कशी करता येईल, यावर काम करीत आहेत.