कोहिमा – जनजातींच्या संस्कृतीचे मनोज्ञ दर्शन

kohima
भारताच्या इशान्येकडील नागालँड हे आजपर्यंत पर्यटनाच्या दृष्टीने फारचे प्रसिद्ध नसले तरी या राज्याचे निसर्गसौदर्य, येथील जाती जमातींच्या अजूनही टिकविल्या गेलेल्या संस्कृती आणि त्याला आधुनिकतेची दिलेली जोड यासाठी या राज्याची सफर आवर्जून करावी अशी आहे. राज्याच्या राजधानी कोहिमा हे पहाडी शांत शहर पर्यटनासाठी आदर्श ठिकाण म्हणता येईल. या शहराचे नावच मुळी केहवीरा या फुलावरून पडले आहे.

या शहराला भेट देणार्‍यांना दोन ठिकाणची भेट अजिबातच चुकवून चालणार नाही. पहिले म्हणजे दुसर्‍या महायुद्धात शहीद झालेल्या शेकडो जवानांचे येथे उभारले गेलेले युद्ध स्मारक. येथे या सैनिकांवर अंत्यसंस्कार केले गेले. दुसरे म्हणजे येथील राजा मिरचीची चव. ही बाब मात्र जरा जपूनच करायला हवी कारण ही राजा मिरची जगातील सर्वात तिखट मिरची म्हणून प्रसिद्ध आहे. नागा जमातींच्या नागरिकांचे हे राज्य असले तरी येथे अनेक जनजाती आहेत. विशेष म्हणजे आधुनिकतेचा स्वीकार करताना त्यांनी आपल्या परंपरा संस्कृतीही जपून ठेवली आहे. त्यांची ही परंपरा दाखविणारे कोहिमा मधील संग्रहालय आवर्जून पाहायला हवे.

डिसेंबरमध्ये येथे किसामा हेरिटेज गावात हॉर्नबील महोत्सव साजरा केला जातो आणि तो फार प्रसिद्ध आहे. राज्यातील सर्व जाती जमातींचे लोक यावेळी परंपरागत वेशभूषेत येतात आणि त्यांची लोकगीते, नृत्य यांचे सादरीकरण करतात. कोहिमापासून जवळ जाफू चोटी हा उंच पहाड ट्रेकसाठी उत्तम आहे. येथून कोहिमाचे नयनरम्य दर्शन होते. येथे राज्यपक्षी टॅगोपॅनही पाहायला मिळतो. गॅरिसन हिलवर युद्धस्मारक आहे.

जून ते सप्टेंबर या काळात गेलात तर इजुको घाटीला भेट द्यायला हवी कारण या काळात येथे अनेक प्रकारची रानफुले फुललेली असतात जणू फुलांचे गालिचे घातल्यासारखी ही फुले दिसतात. कहोनोमा गांव ग्रीन सिटी म्हणून प्रसिद्ध आहे कारण येथील घरांची छपरे हिरव्या रंगांची आहेत शिवाय शेकडो वर्षांचे वृक्ष येथे मुद्दाम जतन केले गेले आहेत. इशान्य भारतातले सर्वात मोठे आणि खास बनावटीचे कॅथॉलिक चर्चही मुद्दाम पहावे असेच. चर्चवर उभारला गेलेला लाकडी क्रॉस १६ फुट उंचीचा आहे. नागालँडमध्ये गेल्यानंतर राजा मिरचीपासून बनलेले पदार्थ, बांबूच्य कोंभापासून बनविलेले खास लोणचे टेस्ट करायचे आणि हाताने विणलेल्या नागा शॉल खरेदी करायच्या हाही कार्यक्रम करायला हवाच.

दीनापूरपासून ७२ किमीवर अंतरावर कोहिमा आहे आणि दीनापूर रेल्वे स्टेशनवर उतरावे लागते. त्यानंतर कार, बसने प्रवास करता येतो तसेच आता एअरपोर्टची सुविधाही झालेली आहे.

Leave a Comment