झुकेरबर्गच्या फेसबुक पोस्टवरून वाद

facebook
नवी दिल्ली :भारताचा चुकीचा नकाशा फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

झुकेरबर्गने फेसबुकवर इंटरनेट डॉट ओआरजी या अंतर्गत कोणत्या भागात कोणकोणत्या वेबसाईट विनामूल्य बघता येतील याबाबतची माहिती देण्यासाठी एक इन्फोग्राफिक पोस्ट केले होते. या इन्फोग्राफिकमध्ये वापरण्यात आलेल्या भारताच्या नकाशात जम्मू-काश्मीर दाखवण्यात आलेले नाही. त्यामुळे भारतीयांनी आपली नाराजी फेसबुकवरच व्यक्त केली आहे. अनेकांनी झुकेरबर्गने पोस्ट केलेल्या इन्फोग्राफिकखाली आपला आक्षेप नोंदवणा-या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काही फेसबुक युझरनी झुकेरबर्गला इन्फोग्राफिकमध्ये दुरुस्ती करून भारताचा योग्य नकाशा वापरण्याचे आवाहन केले आहे. स्वतः भारत दौरा करूनही आणि भारतीय युझरकडून कंपनीला मोठा फायदा मिळत असूनही फेसबुकच्या संस्थापकाने भारताचाच चुकीचा नकाशा स्वतःच्या अकाऊंटवरून पोस्ट केल्यामुळे भारतात तीव्र नाराजी आहे. मात्र काही मवाळ विचारांच्या युझरनी काश्मीरचा काही भाग सध्या पाकने व्यापलेला असल्याचे नमूद करत संपूर्ण जम्मू-काश्मीर भारताच्या नकाशात दाखवणे योग्य होणार नाही, असे मत मांडले आहे. या मवाळ मतप्रदर्शनावरुन पुन्हा मतभेद झाले आहेत.

Leave a Comment