झोपडीत राहणारा केरळचा राजा

raja
निसर्गसुंदर आणि गॉडस ओन कंट्री म्हणून ओळखल्या जाणार्‍या केरळाल कधी भेट दिलीत तर इड्डुकी जिल्हयातील कोवोमला गावालाही जरूर भेट द्या. कारण राजेशाही संपुष्टात आली असली तरीही या गावाला अजूनही राजा आहे आणि तो राजेशाही थाटात नाही तर अगदी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच साध्याशा घरात राहतो. या गावाचा हा १६ वा राजा आहे.

रमण राजा मन्नन असे त्याचे नाव आहे. १५ हजार वस्तीच्या या राज्याचा तो २०१२ साली राजा बनला. कबायली समाजाचे या गावात वास्तव्य आहे. आजही येथील ग्रामस्थांची राजा व त्याचे कुटुंब हेच त्यांचे रक्षणकर्ते असल्याची भावना आहे. रमणच्या पूर्वी त्याचा काका आर्यान हा गावचा राजा होता. येथील प्रथेप्रमाणे राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाला नाही तर पुतण्याला राजाच्या गादीवर बसविले जाते.

रमण राजा अगदी साध्या घरात त्याची पत्नी, मुलगी आणि माजी राणी म्हणजे आर्यानची बायको यांच्यासह राहतो. दुपारच्या वेळी गेलात तर या दोन्ही राण्या घरातली भांडी घासणे, धुणी धुणे अशी कामे करताना सहज पाहायला मिळतात. घरात एक जुना टिव्ही मनोरंजनासाठी आहे आणि बाकी पसारा म्हणजे भांडीकुंडी वगैरे अन्य सर्वसामान्य घरांप्रमाणेच आहेत. राजवंशाच्या ताकदीचे प्रतीक असलेला चेंगोल आजही येथे पाहायला मिळतो.

राजा सांगतो, पूर्वी आमच्याकडेही राजाला योग्य असे भरजरी कपडे घातले जात असत मात्र स्वातंत्र्यानंतर आता परिस्थिती बदलली आहे. आमचे अधिकार कमी झाले आहेत आणि नावाशिवाय आता कांही राहिलेले नाही. मात्र गावातल्या अगदी छोट्या मुलाला जरी विचारलेत तरी तो राजाचे घर तुम्हाला अचूक दाखवितो.

Leave a Comment