मंगळावर सूर्यास्ताच्या वेळी पसरतो निळा रंग

mars
वॉशिंग्टन – सध्या मंगळावर जीवसृष्टी निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे मंगळ ग्रहावर सूर्योदय आणि सूर्यास्त कसा असावा, याबाबतची उत्सुकता वाटणे स्वाभाविकच आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासाने या प्रश्‍नाचेही उत्तर दिले आहे.

नासाने मंगळाचा अभ्यास करण्यासाठी पाठविलेल्या क्युरिऑसिटी यानाने अलीकडेच नीलवर्णीय सूर्यास्ताची छायाचित्रे पृथ्वीवर पाठविली आहेत. यात मंगळ ग्रहाच्या वातावरणात सूर्यास्ताच्या वेळी आकाशात निळा रंग पसरलेला असतो, असे स्पष्ट दिसत आहे.

गेल्या १५ एप्रिल रोजी मंगळावरील सूर्यास्ताच्या छटा ‘क्युरिऑसिटी’च्या मास्ट कॅमेर्‍याने टिपल्या आहेत. धुळीच्या दोन वादळादरम्यान ही छायाचित्रे टिपण्यात आले. असे असले, तरी या छायाचित्रांमध्ये थोडीफार धूळ वातावरणात पसरलेली दिसत आहे. सूर्यास्ताच्या या निरीक्षणामुळे मंगळाच्या वातावरणात धूळ पसरण्याच्या प्रमाणाचा आणि प्रकाराचा अभ्यास करणे शक्य होणार आहे, असे नासाच्या वैज्ञानिकांनी सांगितले. धुळीच्या कणांचा आकार अतिशय लहान असल्याने निळा प्रकाश वातावरणात अधिक प्रभावीपणे पसरला जातो. निळा प्रकाश धुळीवरून परावर्तित झाल्यानंतर तो अन्य रंगांच्या तुलनेत सूर्याच्या दिशेने अधिक जवळ असतो. उर्वरित आकाशात पिवळ्या ते नारिंगी रंगाच्या विविध छटा पसरलेल्या असतात. कारण, पिवळा आणि लाल प्रकाश शोषून घेतला जाण्याऐवजी किंवा सूर्याजवळ राहण्याऐवजी आकाशात सर्वत्र पसरतो, अशी माहिती या निरीक्षणाचे आयोजन करणारे वैज्ञानिक मार्क लेम्मन यांनी दिली.

पिवळ्या रंगापासून तर लाल रंगापर्यंतच्या विविध छटांमुळे पृथ्वीवरील सूर्यास्त नाट्यमय वातावरणाची निर्मिती करतो. मात्र, मंगळावरवरील वातावरणाच्या विशिष्ट रचनेमुळे सूर्यास्ताच्या वेळी सूर्याजवळचा निळा रंग अन्य रंगांच्या तुलनेत अधिक प्रभावी होतो. तसेच दिवसाच्या वेळी धुळीचा रंग अधिक प्रभावीपणे वातावरणात पसरलेला असतो, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment